For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणि आनंदाच्या डोळ्यात आले आनंदाश्रू...! 'शिवम' परिवारामुळे मिळाला डोक्यावर आसरा; 'दै. तरुण भारत संवाद'च्या वृत्तामुळे आला मानवतेचा ओलावा

06:20 PM Jul 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
आणि आनंदाच्या डोळ्यात आले आनंदाश्रू      शिवम  परिवारामुळे मिळाला डोक्यावर आसरा   दै  तरुण भारत संवाद च्या वृत्तामुळे आला मानवतेचा ओलावा
Advertisement

पी.जी.कांबळे, आवळी बुद्रुक

घरात मुलगा, मुलगी, पत्नी दिव्यांग. तिघांनाही चालता येत नव्हते. हाताच्या सहाय्याने सरकत सरकत जाणे. अशा तिघांचाही कर्ता पुरुष. तोच त्यांची सेवा करत होता. तो देखील एक दिवस काळाच्या पडद्याआड निघून गेला. आणि हे कुटुंबच उघड्यावर पडलं. मग प्रश्न पडला व संघर्ष सुरू झाला पोटाची खळगी भरण्याचा. त्यावेळी दैनिक तरुण भारतने 'कर्ता बाप गेला आणि त्या तिघांचा आधारच तुटला...' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून या कुटुंबाला अनेक दानशूर व्यक्ती हातभार लावत आल्या. त्यांच्या राहत्या घराचा देखील प्रश्न देखील अनुतरीत होता. शिवम परिवाराच्या सहकार्याने आज या हतबल कुटुंबाचे घराचे स्वप्न देखील साकार झाले.

Advertisement

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील गरीब दिव्यांग आनंदा सुतार यांचे कुटुंब. घर साधं व पडझड झालेले. अशा या घरात आनंदासह त्याची आई व बहीण दिव्यांग राहत. यांची देखभाल करणारा आनंदाचा बाप श्रीपती हा सत्तरीतला पुरुष. कुटुंबाचा आधारवड असलेल्या श्रीपतीचे देखील निधन झाल्यामुळे या कुटुंबाचा आधारच तुटला. त्यावेळी दै.तरुण भारत ने आनंदाच्या दुःखाची व्यथा मांडली. समाजभान लक्षात ठेवून दानशूर व्यक्तीकडून मदत येऊ लागली. त्यांचे राहते घर देखील मोडकळीस आले होते. शासनाच्या घरकुल योजनेतून तसेच निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 'शिवम प्रतिष्ठान'चे साधक सागर गुरव व इतर कार्यकर्त्यांनी आनंदाचे घर पूर्ण करून दिले. आनंदाने नवीन घरात गृहप्रवेश केल्यानंतर त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रुनी वाट रिकामी केली. दिव्यांग बहिण-भावाचे चेहरे आनंदाने फुलून आले.

आपल्या आई-वडिलांना आधार देण्यासाठी दहावीनंतर कुठेतरी काम करून त्यांना सुखी ठेवण्याचे स्वप्न होते. मात्र दहावी झाल्यानंतर लगेचच अंगात ताप मुरला काही दिवसातच हातपाय लुळे पडले ते आज अखेर. त्यावेळी उपचार करण्यासाठी वडील धडपडत होते. पण गरीब परिस्थिती व आर्थिक पाठबळ नसल्यामुळे चांगल्या दवाखान्यात उपचार करू शकले नाहीत. यामुळे दोन्ही पाय निकामी झाले. माझ्या आजारपणातून सावरतोय न सावरतोय तोच आईला देखील एके दिवशी जोराचा ताप भरला तिला हॉस्पिटलला दाखल केले. तिला घरी आणल्यानंतर एका आठवड्यातच तिचेही दोन्ही पाय डोळे झाले. नियतीने हा खेळ मांडलेला संपणार कधी? हे भोग केव्हा संपणार? असे म्हणत एका अंथरुणावर आनंदा व दुसऱ्या अंथरुणावर त्याची आई पडून असायची.

Advertisement

नियतीने आणखी एक आघात केला तो म्हणजे जेवण करून घालणाऱ्या अर्चना या बहिणीलाही तापाने गाठले. तिथेही हा खेळ संपला नाही. ताप काही कमी येईना. आर्थिक संकटना तोंड देत कसेबसे उपचार केले. मात्र पैसे अभावी योग्य उपचार न झाल्याने तिला घरी आणले. काही दिवसाने तिचेही दोन्ही पाय लुळे पडले. त्यानंतर तिघांचा कर्ताधर्ता बाप श्रीपती त्यांची सेवा करू लागला. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. अशी रोजची जगण्याची लढाई सुरू होती. अशा परिस्थितीत कसबसं कुटुंब चालवणारा वडील देखील काळाने हिरावून नेला. तेव्हापासून होत्याचं नव्हतं झालं. त्यांच्या जमिनी खालची वाळूच सरकली. त्यांचा आधारच गळून पडला. दै. तरुण भारतने आमची दुःख भरी कहानी मांडली. त्यानंतर हळूहळू दानशूर व्यक्तींच्याकडून मदत जमू लागली.

कोणी रेशन दिले, कोणी तेल तर कोणी साखरपुड, तर कोणी रोख रक्कम अशी मदत केल्यामुळे उभारी मिळत गेली. गेल्या वर्षी बहीण दिव्यांग अर्चनाशी आरे येथील विकास शिवाजी सुतार या युवकाने विवाह केला. घराचा प्रश्न सतत भेडसावत होता. गेल्या वर्षी ग्रामपंचायत व सरपंच अमृता चौगले, ग्रामसेवक सुरेश ढेरे व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे घरकुल मंजूर झाले. घर बांधण्यासाठी मजुरी व मनुष्यबळाची कमतरता भासत असताना सेवानिवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवम प्रतिष्ठानचे साधक सागर गुरव व इतर साधक कार्यकर्ते यांनी घर बांधण्यासाठी सहकार्य केले. सोशल मीडियावर गुरव यांनी या बातमीची पोस्ट टाकून मदतीचे आवाहन केले.

याची दखल घेत गोव्यातील उद्योगपती शिवाजी सुतार यांनी घराला लागणारे पूर्ण फर्निचर दिले. गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी सिमेंट पत्रे दिले. शिवम परिवाराच्या साधकांनी एका रात्रीत कोबा करून दिला. प्रत्येक महिन्याला अमृत शेटके यांनी शिधा दिला. यासह घराला लागणाऱ्या लहानसहान वस्तू देणगीतून मिळाल्यानंतर शिवम चे ज्येष्ठ कार्यकर्ते के. द. पाटील, पत्रकार पी.जी.कांबळे व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रांगोळीचा सडा, फुलांचा गालिचा, अगरबत्तीचा दरवळणारा वास एवढीच आरास करून व दरवाजाला बांधलेले फित सोडून वास्तुशांती, गृहप्रवेश करण्यात आला. नवीन कपडे, साड्या असा भरगच्च आहेर कागल येथील वनिता साबणे या भगिनीने भाऊबीज म्हणून दिला. आनंदाला सागरने व अर्चनाला तिच्या पतीने उचलून कडेवर घेऊन गृहप्रवेश केला. गृहप्रवेश केल्यानंतर आनंदाचे डोळे आनंदाने डबडबले. आई-वडिलांच्या आठवणीने आनंदाच्या डोळ्यातील थेंबानी वाट रिकामी करुन दिली.

या साध्या व छोट्या समारंभाला सचिन डोंगळे, दिगंबर किल्लेदार, शेखर पवार, बळवंत साळुंखे, सोमनाथ एरनाळकर, आकाश पाटील, डॉ. अंकुश पाटील, बळवंत पाटील, समाज बांधव, सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.