आखाती देशांमधील गोमंतकीयांच्या कुटुंबियांना घोर
गोव्यातील दोन्ही विमानतळांकडून प्रवाशांसाठी विशेष नियम जारी : सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन
पणजी : विविध आखाती देशांमध्ये नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या शेकडो गोमंतकीय कामगारांच्या कुटुंबियांना सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिकेतील हल्ल्यांमुळे मोठ्या चिंतेने ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विमानेही रद्द झाल्यामुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असून त्या देशांमधील आपल्या नातलगांच्या सुरक्षेबद्दल येथील लोकांना घोर लागून राहिली आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण या देशांदरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे मध्य पूर्व देशांमधील हवाई क्षेत्र बंद झाले आहे. गोव्यातील मोप आणि दाबोळी या दोन्ही विमानतळांवरून उड्डाण करणारी त्या परिसरातील विमाने रद्द करण्यात आल्याचे जाहीर झाले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने शनिवारी रात्रीपासूनच गोवा-दुबई विमानसेवा रद्द केली आहे. रविवार दि. 1 मार्च रोजी दुबई-गोवा आणि गोवा-बहरीन ही महत्त्वाची उड्डाणेही रद्द करण्यात आली असल्याची सूचना दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने जारी केली आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळानेही मध्य-पूर्व देशांमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी विशेष नियम जारी करून आंतरराष्ट्रीय विमान वेळापत्रकात मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी प्रवाशांनी विमानतळावर पोहोचण्यापूर्वी आपल्या संबंधित विमान कंपनीकडे खात्री करावी, असे कळविले आहे. सुरक्षेच्या चिंतेमुळे विमान कंपन्यांनी विलंब आणि संभाव्य अडथळ्यांबाबत इशारे जारी केले आहेत.
घाबरू नका : एनआरआय आयुक्तांचा सल्ला
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातमधील गोमंतकीयांनी सतर्क राहावे, घाबरू नये आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन गोवा अनिवासी भारतीय आयोगाने केले आहे. त्यासंबंधी अधिक माहिती देताना आयोगाचे आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दुबईतील गोमंतकीय लोकांशी आपण बोललो असून तेथील परिस्थिती सामान्य आणि नियंत्रणात असल्याचे सांगितले.