पडिक जमीन लागवडीखाली आणणार
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती : पर्यावरण दिनानिमित्त पणजीत कार्यक्रम
पणजी : कृषी आणि इतर खात्यांच्या सहकार्याने राज्यात पडिक राहिलेली सुमारे 37 हजार हेक्टर जमीन पुन्हा लागवडीखाली आणणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने काल शुक्रवारी पणजीत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रीन गोवा, स्वच्छ गोवा हे उपक्रम तीन महिने चालवले जाणार असून राष्ट्रीय राज्य महामार्गावर हिरवेगार कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत पत्रादेवी ते पोळे महामार्गावर 10 लाख झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. या उपक्रमात पंचायती, नगरपालिका यांनी सहकार्य करावे. पर्यावरण राखण ही सरकारसह सामूहिक जबाबदारी असल्याचे डॉ. सावंत यांनी लक्षात आणून दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी वृक्षारोपणही केले. त्यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि इतर मान्यवरांची हजेरी होती.
खाजन शेतजमीन लागवडीखाली आणणार
मुख्यमंत्री म्हणाले की, खाजन जमिनही पुन्हा शेतीसाठी वापरात आणण्यात येणार असून त्याकरीता तज्ञ मंडळीकडे करार होणार आहे. राज्यातील 18 हजार हेक्टर खाजन जमीन पुन्हा शेतीखाली आणणार असून त्यासाठी सरकारने एका कंपनीकडे समन्वय करार केला आहे.
वापरलेल्या तेलापासून बायोडिझेल करणार
हॉटेल, रेस्टॉरंट, गाडे येथे वापरले जाणारे स्वयंपाकाचे तेल सरकार परत घेणार असून त्यातून बायोडिझेल तयार करण्यात येणार आहे. तेल देणाऱ्यांना त्याची भरपाई दिली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.