For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोपाळा

06:18 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
झोपाळा
Advertisement

झोपाळ्यावर बसायला कुठलेही वय नसले तरी जन्मल्याक्षणी आणि नेत्र पैलतिरी लागले की झोपाळा जास्त जवळचा मित्र, सखा, सोबती असतो असा अनुभव आहे. आईच्या उदरात देहाची कलाकुसर चालू असताना जीव परमात्म्याच्या कुशीत सुरक्षित, आनंदात असतो. त्याला कुठलेही भय नसते. म्हणून तर म्हटले आहे की सद्गुरूजवळ गर्भरूप होऊन राहावे. गर्भावस्था ही एक आनंदावस्था आहे. सोहमचा आनंद घेत निवांत पडलेला जीव कोहम म्हणत रडत जगात येतो तेव्हा त्याला फार फार एकटे वाटते. ओशो रजनीश असे म्हणतात की, आईच्या पोटात जन्म घेताना मूल नाभीद्वारे आईशी संयुक्त झालेले असते. ती अज्ञात अशी विद्युतधारा आहे. जन्म होताच बालकाचे पोषण करणारी नाळ कापावी लागते. ते आवश्यकच असते. जेव्हा आई आणि बाळ वेगळे होण्याची घटना घडते तेव्हा बाळाची जीवनधारा क्षणात बंद होऊन जाते, त्यामुळे बाळाचे प्राण तळमळतात. जीवनधारा तुटून गेल्याची वेदना बाळाला जाणवते. त्याला आई कुशीत घेऊन दूध पाजते तेव्हाच बाळ निश्चिंत होते. आईच्या गर्भाशयामधली सुरक्षितता त्याला थोडीफार जाणवते ती जन्मल्याबरोबर झोपाळ्याची बहीण असलेल्या झोळीत. ताह्याबाळाला सोबत ही झोळीचीच असते. आणखी एक सोबत असते ती अंगाईच्या सुरांची. अंगाईचे बोल, भाषा जरी त्या ताह्या जिवाला उमगत नसली तरी स्वरांची मोहिनी त्याला निद्रादेवीच्या कुशीत नेऊन सोडते.

Advertisement

अंगाईगीतांना पाळणागीते असेही म्हणतात. फक्त भारतामधलीच नाही तर जगामधली आई बाळाला स्वभाषेत अंगाई गाते. पाळणागीतांना प्राचीन इतिहास आहे. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात याचा उगम आढळतो. या गीतांना हल्लरगीते असेही म्हणतात. बाळासाठी पाळणा हा मामाकडून म्हणजे त्याच्या आजोळकडून येतो असा संकेत आहे. पाळणा म्हणजे बाळाचे संरक्षण. जगाचे रक्षण करणाऱ्या परमेश्वराला पाळण्यात झोपवून त्याच्या आदर्शाचे गायन अंगाईगीतातून करणारे मानवी मन अनाकलनीय तर आहेच; शिवाय अद्भुतही आहे.

जन्माला आल्यापासून जवळीक साधणारा झोपाळा वयाच्या विविध टप्प्यांवर निरनिराळ्या भावनांचा विकास करतो. लहानपणी मनोरंजन, तारुण्यात बेफिकिरी, चाळीशीत सुरक्षा, पन्नाशीत जबाबदारी, साठीमध्ये कृतकृत्यता आणि त्यानंतर तो परमात्मा मृत्यूचा नजराणा कधी पाठवतोय याची निवल्या डोळ्यांनी धास्तीयुक्त वाट बघणे यात झोपाळ्यावरचे जीवन संपते. तान्हेपण आणि वार्धक्य हे जगण्याचे दोन टप्पे झोपाळ्याशी गुज करणारे आहेत. आईच्या गर्भातून निघाल्यानंतरचे एकटेपण व मृत्यूच्या अज्ञातवाटेकडे घेऊन जाणारा एकांत जाणून घेणारा हा झोपाळा आहे. पूर्वी घरोघरी झोपाळा असायचा. आजी-आजोबा, आल्यागेल्या पाहुण्यांचा तो विसावा होता. जणू घरामध्ये न बोलता समजून घेणारे हक्काचे माणूसच! जात्यावरती ओवी गाणाऱ्या स्त्रियांनी झोपाळ्याशी नाते जोडून संवाद साधला आहे. त्या म्हणतात- ‘झोपाळा रे दादा, मुलांना आवडसी मागेपुढे नाचतोसी आनंदाने / झोपाळा रे दादा, आम्हाला तुझा लळा, चैन पडेना बाळाला तुझ्याविना..’   झोपाळ्याशी दादाचे नाते जोडून त्यांनी जणू सासरी माहेरचे सुख अनुभवले.

Advertisement

झोपाळा देवालाही प्रिय आहे. उत्तर प्रदेशात श्रावण महिन्यात झुलनयात्रा हा उत्सव असतो. या दिवसांत राधा-कृष्ण यांना झोपाळ्यावर बसवून झोके देतात. देवीपुराण या ग्रंथामध्ये दोलोत्सवासंबंधी विवेचन आहे. चैत्र ते वैशाख असा हा उत्सव असतो. देवांच्या मूर्ती झोपाळ्यात बसवून त्याला झोके देतात. मथुरा, वृंदावन, अयोध्या, काशी, द्वारका, डाकोर येथे दोलोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. तो प्रेक्षणीय थाट बघण्यासाठी हजारो यात्रेकरू जमतात.

संत एकनाथ महाराजांनी स्वत:च्या हृदयाचा झोपाळा करून सद्गुरूकृपेने श्री दत्त प्रभुंना त्यात बसवले. ते म्हणतात, ‘सद्गुरूकृपे श्री दत्त ओळखिला, हृदय दोला, त्यावरी बैसविला.’ चैत्र महिन्यात गौरी माहेरी येते. तिचे लाड पुरवण्यासाठी झोपाळा बांधून त्यात तिला बसवतात. स्त्रियांचे डोहाळजेवण हा विधी झोपाळ्यावर करतात. सजवलेल्या, कलाकुसर केलेल्या झोपाळ्यावर गर्भवती स्त्राr बसते. त्यानिमित्ताने जमलेल्या स्त्रिया तिचे डोहाळे पुरवतात. गर्भात निवांत पडलेल्या त्या जिवाला जणू झोपाळा सांगत असतो- ‘सुरू झाली बरे का तुझी येरझार’. कर्माचा खेळ, दुसरे काय! जन्मायचे, मरायचे, मरायचे, जन्मायचे... जन्माला येऊन सुखदु:खाचे हेलपाटे खायचे. जगणे कधी उंच, तर कधी तळाशी. झोका उंच उंच गेला की आजूबाजूचे जग छोटे दिसते तेव्हा गर्वाने तू फुलून जाऊ नको. धरणीशिवाय जगण्याला पर्याय नाही. धरित्रीची लेक बहिणाबाई चौधरी यांची कविता अंतर्मुख करणारी आहे.

‘अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी

तिनं झोका झाडाले टांगला

पिलं निजली खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव

जीव झाडाले टांगला..!’

-माणसाचाही जीव जन्ममरणाच्या झुलत्या खेळात अडकून जातो. झोपाळा हे काळाचे प्रतीक आहे. जीव युगानुयुगे जन्माला येतो आहे. काळाच्या पोटात गुप्त होऊन पुन्हा नव्याने जन्मतो आहे परमेश्वर मात्र स्थिर आहे.

‘काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही’

-झोपाळा जीवनाचे, जगण्याचे तत्वज्ञान शिकवतो. बहिणाबाई चौधरींच्याच शब्दात सांगायचे तर

‘आला सास गेला सास

जिवा तुझं रे तंतर

अरे, जगनं-मरण

एका सासाचं अंतर’

-एका श्वासाचे अंतर सांगणारा असा हा झोपाळा घरोघरी हवाच.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.