बनावट विदेशी चलन रॅकेटचा भांडाफोड
गुजरातमध्ये केली जात होती छपाई
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पोलिसांच्या विशेष मोहीम पथकाला अहमदाबादच्या वेजलपूर येथे बनावट चलनी नोटा वापरात आणल्या जात असल्याची टीप मिळाली होती. ज्यानंतर या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे.
24 वर्षीय मजूर रौनक राठोडला सर्वप्रथम 50 डॉलर्सच्या 119 बनावट ऑस्ट्रेलियन नोटा बदलून घेण्याच्या प्रयत्नादरम्यान अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत खुश पटेलकडून या नोटा मिळाल्याचे कळले, ज्यानंतर खुश पटेलला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कथित सूत्रधार 36 वर्षीय मौलिक पटेलसंबंधी माहिती समोर आली, मौलिक हा एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अहे. मौलिक पटेल हा 20 वर्षीय ध्रूव देसाईसोबत मिळून एका कारखान्यात बनावट ऑस्ट्रेलियन नोटा छापण्याचे काम करत होता.
पोलिसांनी 50 डॉलर्सच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य 11 लाख 92 हजार 500 रुपये इतकेआहे. याचबरोबर 7 मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांनी बनावट नोटांसाटी टेम्पलेट म्हणून वापरण्यात येणाऱ्या खऱ्या नोटाही हस्तगत केल्या आहेत.