पोलीस आयुक्तांच्याच नावे बनावट फेसबुक अकौंट
फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून बनवताहेत मूख
बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे उपद्व्याप थांबता थांबेनात. पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुकवर बनावट अकौंट उघडण्याचे प्रकार सुरूच आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नावे फेसबुक अकौंट उघडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शहर सायबर क्राईम पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेळगावातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार आदींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या आहेत. स्वत: पोलीस आयुक्तांची आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे म्हणून अनेकांनी आनंदाने ती स्वीकारली आहे. रविवारी रात्रीपर्यंत 181 हून अधिक जणांनी त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे.
हा प्रकार पोलीस आयुक्तांसह पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने शहर सायबर क्राईम विभागात यासंबंधी अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट अकौंट उघडणारे गुन्हेगार कोण? याचा शोध घेण्यात येत आहे. यापूर्वी वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. दयानंद यांच्यासह अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुकवर बनावट अकौंट सुरू करण्यात आले होते. परिचितांकडून पैसे उकळणे हाच अशा कृत्यामागचा प्रमुख हेतू असतो. रविवारी रात्रीपर्यंत तरी यासंबंधी कोणालाही मेसेज आले नाहीत. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यानंतरच त्यांचा उद्देश स्पष्ट होणार आहे.