मदरशातून 16 लाखांच्या बनावट नोटा जप्त
मध्य प्रदेशातील खंडवा येथे इमामाला अटक : आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश : महाराष्ट्रापर्यंत धागेदोरे
वृत्तसंस्था/ खंडवा
मध्य प्रदेशात खंडवा येथील पोलिसांनी रविवारी एका मोठ्या बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केला. जिह्यातील जवार पोलीस स्टेशन हद्दीतील पैठिया गावातील एका मदरशातील इमामाच्या खोलीतून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ही रक्कम 16 लाख रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मालेगाव पोलिसांनी पैठिया मशिदीचा इमाम, अशरफ अन्सारी यांचा मुलगा झुबेर याला त्याच्या साथीदारासह अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. बुरहानपूरच्या हरिपुरा भागातील रहिवासी झुबेर हा मदरशाच्या वर भाड्याच्या घरात राहत होता.
मालेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत खंडवा पोलिसांनी पैठिया गावात छापा टाकत एका मदरशातून बनावट नोटांचे अनेक गठ्ठे जप्त केले. पोलीस पथकाने घटनास्थळी शोध सुरू करत बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी आता अधिक तपास सुरू केला. या कारवाईवेळी मोठ्या संख्येने अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. सायंकाळपर्यंत 12 लाख रुपये किमतीच्या नोटा मोजण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मोजदाद सुरूच होती. यात सहभागी असलेल्या टोळीचा आणि बनावट नोटा कुठे छापल्या गेल्या याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. हे प्रकरण आंतरराज्यीय बनावट नोटा रॅकेटशी जोडलेले असू शकते. खंडवा पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्याचे काम करत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.