बनावट कॉल सेंटरचा करमळीत पर्दाफाश
सात जणांना अटक : 23 लाखांचे साहित्य जप्त
पणजी : सायबर गुन्हा विरोधी विभागाने करमळी येथे केलेल्या कारवाईत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सात संशयितांना अटक केली असून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल वस्तू मिळून अंदाजे 23 लाख ऊपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे. अटक केलेल्या सातही संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांमध्ये जय विजय आचार्य (मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र), योगेश सोहनलाल माळी (अहमदाबाद, गुजरात), ऋषभ दीपककुमार शाह (गांधीनगर, गुजरात), आशुतोष योगेश प्रताप (अहमदाबाद, गुजरात), ठक्कर पार्थ भारभाई (अहमदाबाद शहर, गुजरात), एड्रियन किन्स्टन मारियासेवान (मुंबई, महाराष्ट्र) आणि नीलेश सतीश सिंग (नागपूर, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. ही कारवाई सोमवार 13 रोजी रात्री 11:30 ते मंगळवार 14 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत करण्यात आली.
सायबर गुन्हा विरोधी विभागाचे पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तिसवाडीतील करमळी येथे एका भाड्याच्या बंगल्यावर असलेल्या कॉल सेंटरवर यशस्वी छापा मारुन ही कारवाई केली आहे. संशयित ‘पेडे’ या नावाने कर्ज देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून, कर्ज आणि त्वरित पैसे देण्याच्या आमिषाने अमेरिकेच्या निष्पाप नागरिकांना गिफ्ट कार्ड्सच्या (सेफोरा, मेसीज, ग्रीन डॉट मनी पॅक, अॅपल गिफ्ट कार्ड, रेझर गोल्ड आणि एक्सबॉक्स) स्वरुपात मोठी रक्कम भरण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले.
ही कारवाई सायबर गुन्हा विरोधी विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर, पोलिस उपनिरीक्षक नवीन नाईक, हवालदार योगेश खांडेपारकर, वीरेंद्र वाडकर, पोलिस कॉन्स्टेबल इब्राहिम करोल, मयूर राणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्नेहा चारी, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय वर्लेकर, यश कोले आणि सिद्रामाया मठ यांनी, सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या देखरेखीखाली केली आहे. पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.