For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फडणवीसांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा!

06:14 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
फडणवीसांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement

राज्याच्या सत्तापक्षातच सातत्याने उठत असलेल्या वादळाने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ढगफुटी बरसात अनुभवली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा संवाद कमी असल्याचे त्यांचे म्हणणे म्हणजे थेट इशारा आहे. आपण पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल आहोत, स्थानिक स्वराज्य संस्थेत स्व पक्षाला प्राधान्य असेल आणि दोघांपेक्षा आपण आपल्या पक्षश्रेष्ठींना जास्त ओळखतो हे त्यांचे बोल सत्तेच्या वळचणीला बसलेल्यांवर वीज कोसळावी असेच आहेत. अर्थात राजकारण असे एकतर्फी चालत नसते. पण, मुख्यमंत्र्यांनी इशाऱ्याचा भाला तरी दाखवला आहेच!

Advertisement

एक्सप्रेस माध्यम समुहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले त्याची सुरुवात त्यांनी गेल्या आठवड्यातील सांगलीच्या दौऱ्यापासूनच सुरू केली होती. आधीच्या सहा महिन्यात त्यादृष्टीने ते हळूहळू ट्रॅक ठरवतच आले आहेत. आपल्याला गतिमान आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन घ्यायचे आहे हा संदेश ते पोहोचवतानाच या सरकारवर आपलीच पूर्ण कमांड असेल हे ते दाखवून देत आहेत. याच दरम्यान घडलेल्या घटना मात्र फडणवीस यांच्या गतीला कमी करणाऱ्या आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, त्यामध्ये अजित दादा पवार यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षाचा सहभाग, सुप्रिया सुळे, ठाकरे सेना आणि मनसे यांनी तो मुद्दा उचलून धरणे, त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटणे आणि घाईगडबडीने अजितदादांनी या प्रकरणापासून अंग झटकण्याचा प्रयत्न करणे हे गेल्या आठवड्यात घडले. दरम्यानच्या काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्या वक्तव्यांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले. त्या गर्तेत अजितदादांची राष्ट्रवादी अडकल्याचे दिसले. सुप्रिया सुळे आणि ठाकरे सेनेने हा मुद्दा आता आंदोलनाचा करायचा ठरवला आहे. प्रकरण हुंडाबळीशी संबंधित असल्याने ते घराघरात चर्चेला आले आहे. वरवर पाहता सरकारमध्ये एक आहोत हे दाखवण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने या प्रकरणात सावध प्रतिक्रिया दिल्या तरी त्यांचे प्रवत्ते मात्र वेगळ्या दिशा दाखवत आहेत. एकमेकांवरील कुरघोडी त्यातून दिसून येत आहे. हे प्रकरण सुरू असतानाच संभाजीनगरमध्ये मंत्री शिरसाट यांच्या पुत्रावर एका महिलेने खळबळजनक आरोप केले. हे प्रकरण अधिक तापू न देता शिंदेसेनेने तीव्र हालचाली केल्या. संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने शिंदे सेना सावरु शकली. त्याच्या आदल्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट यांनी कामगार मंत्रालयातील भ्रष्टाचाराबद्दल वक्तव्य करून भाजपला निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याबरोबरच उद्योजक ल•ा दरोडा प्रकरणात काही पोलिस सामील असल्याचा त्यांचा आरोप, पोलिसांना फ्री हॅण्ड दिला तर 24 तासात स्थिती बोलेल हा अप्रत्यक्षपणे गृहमंत्रालयाला डिवचले गेले आहे. याच दरम्यान शिरसाट पुत्राकडून एका हॉटेल खरेदीसाठी प्रचंड रक्कम कुठून आली? हा संजय राऊत यांचा आरोप, अंबादास दानवे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे! ठाकरे सेनेला हे सहज मुद्दे उपलब्ध झाले. हे कमी होते म्हणून की काय मुंबई मेट्रोच्या ज्या टप्प्याचे सरकारने उद्घाटन केले तिथल्याच बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी पाणी शिरल्याने तसेच मुंबईच्या विविध विभागात पाणी तुंबल्यामुळे हाहा:कार उडाला. त्यानेही सरकारची पूरती बदनामी झाली. वास्तविक या विषयावर सरकारची भूमिका मांडायला तिन्ही पक्षांना पुरता वाव असताना त्यांनी तो मुंबई महापालिकेत ठाकरे सेनेची सत्ता असतानाच्या काळावर ढकलण्याचा प्रयत्न करून उलट आपल्या विरोधात जनमताला अधिक आमंत्रण दिले. यावर फडणवीस यांनी नंतर केलेला खुलासा अधिक समर्पक होता. ज्यामध्ये मेट्रोच्या 16 स्टेशनवर कोणतीही अडचण आली नाही. ऑगस्टमध्ये पूर्ण होणाऱ्या कामाला पावसाचा फटका बसला, ते अपुर्ण कामच होते. मुंबईत जूनमध्ये 450 पंपाद्वारे पावसाचे पाणी बाहेर काढले जाते. मात्र मे महिन्यात पाऊस झाल्याने पुरेशी व्यवस्था नव्हती. हे लोकांना किमान सहानुभूती दर्शवणारे मुद्दे न सांगता प्रतिक्रियावादी भूमिका घेतल्याने सरकारची या प्रकरणातही नाचक्की झाली. या आणि अशा अनेक घटनांमध्ये फडणवीस यांची भूमिका आणि इतर दोन सत्ताधारी पक्षांची भूमिका ही वेगवेगळ्या दिशेने जाणारी असल्याने त्याचा अंतिम परिणाम सरकारची बदनामी होण्यात होत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याशी सुयोग्य संवाद साधून नाहीत हे फडणवीस यांनी (त्यांची माफी मागून) स्पष्टपणे सांगितले. परिस्थिती कसलीही असली तरी शरद पवारांचे कामात सातत्य असते, या त्यांच्या वक्तव्यातून बरेच अर्थ आणि संदेश मिळतात. अर्थात हा इशारा शिंदे, पवार आणि त्यांचे आमदार, मंत्री कितपत गांभीर्याने घेतात हे पुढील काळात समजेलच. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले प्राधान्य अजित पवारांना की शिंदे यांना असेल? याबद्दलचा खुलासा करताना त्यांनी भाजपलाच प्राधान्य असेल असे वक्तव्य करणे, या दोन्ही पक्षांपेक्षा केंद्र सरकारशी आपणच चांगले डील करू शकतो आणि आपल्या पक्षश्रेष्ठींना एखाद्या विषयावर आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो, कारण त्यांना त्या दोघांपेक्षा आपण अधिक चांगले ओळखतो हे फडणवीस यांनी शिंदे, पवार दोघांसाठीच स्पष्टपणे सांगून टाकले आहे. आपण 2014 आणि 19 च्या काळातील अनुभवाने अधिक संपन्न आणि प्रगल्भ बनलो आहोत. हे राज्य आपण अधिक आत्मविश्वासाने चालवत आहोत. आता आपल्याला आपल्या सत्ता काळाचा प्रभाव दाखवणारा प्रशासक म्हणून पुढे यायचे आहे. आडवे येतील त्यांना सोसावे लागेल हे त्यांनी एका झटक्यात सांगून टाकले आहे. कोणत्याही पातळीवर भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, विरोधकांमधील अर्बन नक्षल मंडळींवर अधिक कारवाई होईल, राज्यात लव्ह जिहाद विरोधात आपल्या कारवाया वाढतील, भ्रष्ट अधिकाऱ्यांना शोधले जाईल आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर अंकुश आणला जाईल, विरोधकांशी सुद्धा जशास तसे वागले जाईल. आपल्या दृष्टीने ज्या पद्धतीने विकासाची गती साधणे आवश्यक आहे त्याच गतीने कामे होतील. ग्रामीण भागात विकास प्रकल्प, पवन आणि सौरप्रकल्प रोखणाऱ्यांना हद्दपार करु आणि यापुढे भ्रष्टाचारा विरोधात आपले पोलीस दल सक्रिय होईल असे एकापेक्षा एक तोफगोळे फडणवीस यांनी डागले आहेत. सत्तेच्या आश्रयाला बसलेल्या दोन पक्षांना हा मोठा धक्का ठरू शकतो. राज्यात अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसात ट्रॅक्टरखाली आश्रयाला बसलेल्या मजुरांवर वीज कोसळून जखमी होण्याची घटना घडली. मंत्र्यांना देखील आपण सत्तेच्या वळचणीला सुरक्षित आहोत असे या घटनेनंतर वाटणार नाही! राज्यात विरोधकांप्रमाणेच सत्तेतील मंडळींच्या वाट्यालाही होरपळ येऊ शकते. याचेच हे द्योतक मानायला हवे. फडणवीस यांचा इशारा तर संयमित शब्दात त्याच आक्रमकतेचा आहे...!

शिवराज काटकर

Advertisement

Advertisement
Tags :

.