भारतात होतोय पहिला सेमीकंडक्टर प्रकल्प?
काही आठवड्यांमध्ये घोषणा होण्याची केंद्रीय मंत्री वैष्णव यांची माहिती : प्रकल्पा संदर्भात उत्सुकता वाढीस
नवी दिल्ली
देशातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची घोषणा काही आठवड्यांत करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सरकार कटिबद्ध असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच दिली आहे. देश पुढील 3-4 वर्षांत मजबूत चिप उद्योगासाठी सज्ज असणार असल्याचा दावा मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडस्ट्री कौन्सिल सीआयआयच्या ‘पार्टनर समिट’ 2023 च्या सत्रादरम्यान केला आहे.
आज भारतात वापरले जाणारे 99 टक्के मोबाईल फोन येथे बनवले जातात. हे 10 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या अगदी उलट आहे, जेव्हा 99 टक्के फोन विदेशातून आयात केले जात होते. ते म्हणाले, ‘आता वातावरण भारतासाठी निर्मितीकरीता अत्यंत पोषक आहे. मोबाईल फोन उत्पादन क्षेत्रात भारताचा क्रमांक दुसरा आणि निर्यातीच्या बाबतीत तिसरा क्रमांक राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सेमीकंडक्टर निर्मितीचा विचार करता भारत हा अमेरिका, दक्षिण कोरीया आणि युरोपियन देशांशी स्पर्धा करतो आहे. चिपच्या कमतरतेमुळे व पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने भारताला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यातूनच आता भारतातच सेमीकंडक्टरच्या निर्मितीबाबतच्या हालचाली गतीमान होताना दिसत आहेत. याला अनुषंगूनच आगामी काही दिवसात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात अमेरिका आणि भारत यांनी एक सहकार्याचा करार केला असून त्यात एकमेकांच्या सहकार्यातून सेमीकंडक्टर पुरवठा साखळी सुनियोजीत करण्यासह कल्पकतेतून भागीदारी साकारण्याबाबत एकमत झाले असल्याचे समजते.