महाकुंभमध्ये 40 कोटी लोकांसाठी सुविधांची उभारणी
4 महिन्यांत 300 किमी लांबीच्या रस्त्यांची निर्मिती, 30 तरंगते पूल उभारले : मेळाक्षेत्रात लाखा कर्मचारी कार्यरत : जय्यत तयारी
वृत्तसंस्था/ प्रयागराज
महाकुंभसारख्या विशाल आयोजनासाठी आव्हानांवर मात केवळ 4 महिन्यांत उत्तम सुविधांनी युक्त शहर प्रयागराज येथे वसविण्यात आले आहे. 50 दिवसांच्या या आयोजनात सुमारे 40 कोटी भाविक पोहोचण्याची अपेक्षा आहे. मागील 4 महिन्यांमध्ये 300 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. एक किमी लांबीचे 30 तरंगते पूलही उभारण्यात आले आहेत. कालमर्यादा पाहता सर्व कर्मचारी दिवसातील 15 तास काम करत आहेत. सुटी, ओव्हरटाइम याची चिंता न करता हे कर्मचारी काम करत आहेत.
महाकुंभ शहरात पेयजल आणि सांडपाणी वाहून नेण्यासारखी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. समृद्ध लोकांसाठी फाइव्ह स्टार डोम तर गरजूंसाठी डॉरमेट्री निर्माण करण्यात आली आहे. या महाआयोजनाकरता आधुनिक व्यवस्थापनाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक कामाचा दररोज आढावा घेत ते मार्गी लावण्यावर भर दिला जात आहे. शहराला आधुनिक सुविधांनी युक्त करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये गर्वाची भावना निर्माण व्हावी याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. कुंभ क्षेत्रात हजारो सफाई कर्मचारी, नाविकांपासून सिव्हिल इंजिनियर्समध्ये गर्वाची ही भावना दिसून येत आहे.
महाकुंभनगरमध्ये नेत्र रुग्णालयत
महाकुंभनगरमध्ये नेत्र रुग्णालय देखील निर्माण केले जात आहे. हे जगातील आतापर्यंतचे सर्वात मोठे तात्पुरते रुग्णालय ठरणार आहे, या रुग्णालयात 45 दिवसांमध्ये 5 लाख शस्त्रक्रिया होणार असून 3 लाख गरीबांना चष्मे देण्याचीही तयारी असल्याचा दावा मेळा प्रशासनाने केला आहे. रुग्णालयाचा सेटअप तयार करणे, दोन महिन्यांनी तो हटविणे आणि यंत्रसामग्री स्वत:च्या ठिकाणी पोहोचतील हे सुनिश्चित करणे मोठी लॉसिस्टिक कवायत असून याला अचूकतेने साकारणे मोठे आव्हान आहे.
कर्मचाऱ्यांकडे वॉकी-टॉकी
कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक दाखल होणार असल्याने मोबाइल नेटवर्कवर पडणारा प्रचंड ताण पाहता प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना परस्परांच्या संपर्कात ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कर्मचारी आता वॉकी-टॉकीद्वारे परस्परांच्या संपर्कात राहण्याचा सराव करत आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना अन्य यंत्रसामग्री हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
हवामान विभागाकडून वेबपेज
भारतीय हवामान विभागाने महाकुंभ 2025 साठी एक समर्पित वेबपेजचा शुभारंभ केला आहे. हे वेबपेज महाकुंभच्या पूर्ण क्षेत्रात हवामानाचा अनुमान आणि इशारा जारी करण्यास सक्षम असेल. यामुळे भाविक आणि मेळा प्राधिकरणाला त्यांची सुरक्षा आणि व्यवस्था करण्यास मदत मिळणार आहे.
महाकुंभसाठी 7 राज्यांमधून विशेष रेल्वे
महाकुंभसाठी रेल्वे विभागाने विशेष रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक जारी करण्यास सुरुवात केली आहे. प्रयागराजसाठी दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचलच्या विविध शहरांमधून विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. याचबरोबर आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातूनही विशेष रेल्वेगाड्या प्रयागराजसाठी रवाना होणार आहेत.