For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी-बारावी मूल्यमापकांना ‘चेहरा ओळख’ अनिवार्य

11:22 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहावी बारावी मूल्यमापकांना ‘चेहरा ओळख’ अनिवार्य
Advertisement

हजेरीसाठी ‘कर्तव्य‘ अॅपचा वापर होणार; दिवसातून दोन वेळा हजेरी बंधनकारक

Advertisement

बेळगाव : दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तर पत्रिकेच्या मूल्यमापनासाठी नियुक्त शिक्षक व परीक्षकांसाठी यावर्षी चेहरा ओळख (फेशियल रिकग्निशन) प्रणाली बंधनकारक  करण्याचा निर्णय शिक्षण व साक्षरता विभागाने घेतला आहे. यासाठी शिक्षकांना ‘कर्तव्य’ या सरकारी मोबाईल अॅपचा वापर करून हजेरी देणे बंधनकारक असणार आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने हा निर्णय घेतला असून, सर्व सरकारी शाळा व पीयू महाविद्यालयांतील शिक्षकांना या प्रणालीचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मूल्यांकन केंद्रांमध्ये तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या वेळीही याच प्रणालीद्वारे हजेरी नोंदवावी लागणार आहे.

त्यानुसार या अॅपद्वारे शिक्षकांचा चेहरा ओळखून, जिओ-टॅगिंगच्या माध्यमातून संबधित शाळा किंवा महाविद्यालयातच उपस्थिती आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे. शिक्षकांना दिवसातून दोनवेळा हजेरी नोंदवावी लागणार आहे. या निर्णयामुळे उत्तरपत्रिका मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, तसेच शिक्षकांमधील जबाबदारीची भावना अधिक बळकट होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. मागील शैक्षणिक वर्षात ही प्रणाली गदग येथे मूल्यमापन शिक्षकांसाठी यशस्वीरित्या राबविण्यात आली. त्यानुसार यावर्षी शिक्षकांसाठी तर पुढील शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अशीच प्रणाली लागू करण्याचा विचार शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून सुरू आहे. मागील वर्षी राज्यातील 235 केंद्रावरील पेपरचे मूल्यमापन करण्यात आले. यावर्षी दहावीची वार्षिक परीक्षा 18 मार्च तर बारावीची 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Advertisement

शिक्षकांना मिळणार थेट मानधन

2025-26 वर्षापासून एसएसएलसी परीक्षा-1 च्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे आधार संलग्न बँकखात्यामध्ये मानधन थेट जमा केले जाणार आहे. त्यासाठी शालेय स्तरावर मुख्याद्यापकांना आधार संलग्न बँक खाते असणाऱ्या शिक्षकांची नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकांना याचा लाभ होणार आहे.

Advertisement
Tags :

.