संकटांचा सामना करा; यश नक्कीच मिळते
नितीन बानुगडे पाटील यांचे प्रतिपादन, मच्छे येथे व्याख्यान : नागरिकांची कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती
वार्ताहर/किणये
माणसांच्या आयुष्यात अडथळे, संकटे, अडचणी यायलाच पाहिजे. संकटं तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुमच्यातील क्षमता बाहेर काढतात आणि अडथळे तुमच्यातले कौशल्ये सिद्ध करतात. त्यामुळे संकटांना घाबरु नका, संकटांचा सामना करा. यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी मच्छे येथे केले. स्वामीनगर मच्छे येथील श्वेतार्क गणेश मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते तरुणांना मार्गदर्शन करत होते.
ते पुढे म्हणाले, पराभव हा पहिल्यांदा रणात होत नाही, खरेतर पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत. आणि जी मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूत होत नाहीत. यश आणि आपण यामध्ये केवळ भीती हे अंतर आहे. भीती घालवली की, यश नक्कीच मिळते. तरुणांनी स्वत:मधील सामर्थ्यांची ओळख करून घ्यायला हवी. कोणतीही गोष्ट अवघड नसते. ती केवळ सातत्याने करायला हवी. कृती, हालचाल महत्त्वाची आहे. अलीकडे रिल्स बनविण्यात तरुणाईंचा वेळ अधिक खर्ची होऊ लागला आहे.
ज्या घरात आई-वडिलांच्या हातात मोबाईल आहे. त्या घरातील मुलांच्या हातातही नक्कीच मोबाईल येणार आहे. ज्यांना पिढी घडवायची आहे, त्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळावा. मुलांना मोबाईल ऐवजी पुस्तके द्या, मुलांना जगाच्या बाजारपेठेचे ज्ञान द्या, असेही बानुगडे पाटील म्हणाले. आज अंगारकी संकष्टीनिमित्त मच्छेसारख्या गावात व्याख्यानासारखे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रदर्शनाबरोबरच विचारदर्शनसुद्धा महत्त्वाची आहेत. भक्तीबरोबरच विचारांच्या शक्तीचाही हा उत्सव तुम्ही आयोजित केला आहात, असे सांगून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा बिंदले होते. श्वेतार्क गणेश मंदिर कमिटीचे अध्यक्ष मारुती लोकूर यांनी स्वागत केले. व्यासपीठावर संतोष जैनोजी, रवी कळेकर, बंडू चौगुले, चांगप्पा पाटील, जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.