CPR Hospital Kolhapur: जबड्यातील कॅन्सरची गाठ काढून चेहरा केला पूर्ववत
उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) जबड्यातील कॅन्सरसदृश्य गाठ काढण्याची शस्त्रक्रीया यशस्वी करण्यात आली. तसेच पायाचे हाड बसवून सदर रूग्णाचा चेहरा पूर्ववत करण्यात आला. राधानगरी तालुक्यातील धामोड येथील देवता तिबीले (वय 25) यांना तीन वर्षापूर्वी जबड्यामध्ये कॅन्सरसदृश्य गाठ उद्भवली होती.
त्यावेळी एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या जबड्यात सदर गाठ उद्भवली. पुर्वीपेक्षा अधिक मोठी गाठ होती. त्यांना उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सीपीआरच्या दंतचिकित्साशास्त्र विभागातील डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सदर रूग्णाचा जबडा व जबड्यातील गाठ काढून पायाच्या हाडाला जबड्याचे स्वरूप दिले. रक्तवाहिन्या जोडून रक्तपुरवठा सुरळीत केला. जबडा काढल्यानंतर चेहऱ्याचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी तब्बल 12 तास परिश्रम घेऊन गुंतागुंतींची मायक्रोव्हॅस्कुलर शस्त्रक्रिया करण्यात आली. सीपीआरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात यश मिळाले आहे.
शस्त्रक्रियेमध्ये दंतशास्त्र विभागातील डॉ. अमोल लाहोटी, डॉ. गायत्री कुलकर्णी व डॉ. प्रियांका सावडकर, डॉ. नितीन जैसवाल, डॉ. प्राची पन्हाळे यांनी जबडयाच्या गाठीची तपासणी करुन जबडा काढला. डॉ. वसंत देशमुख व डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी व त्यांचे सहकारी डॉ. तन्मय, डॉ. त्यागराज, डॉ. नेहा यांनी पायाचे हाड काढून जवडयाचा आकार देऊन योग्य रक्त पुरवठा होण्यासाठी नसेला नस जोडण्याची मायक्रोव्हॅस्कूलर सर्जरी केली.
शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. उल्हास मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्योती नैताभ व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कान-नाक-घसाशास्त्र विभागात शस्त्रक्रीया करण्यात आली. सर्व प्रक्रियेसाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे व अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी सहकार्य केले.
मोफत उपचार
"सदर शस्त्रक्रीयेसाठी खासगी रूग्णालयात 6 लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र सीपीआरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व उपचार मोफत करण्यात आले. दंतशास्त्र विभागात जबड्याशी निगडीत सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा."
- डॉ. अजित लोकरे, अधिष्ठाता