Political News: सत्तेचे तीन चेहरे अन् महाराष्ट्राचं राजकारण
तिसरा सत्तेचा चेहरा मध्यममार्गी स्वरूपाचा असतो
By : डॉ. प्रकाश पवार, राजकीय अभ्यासक
कोल्हापूर : ऐंशीच्या दशकापासून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेचे स्वरूप बदलले. राजकीय सत्तेला खरे तीनच चेहरे असतात. सत्तेचा डावा चेहरा हा एक पुरोगामी सत्तेचे स्वरूप धारण करणारा चेहरा असतो. दुसरा सत्तेचा चेहरा उजव्या प्रकारचा म्हणजेच उजवे सत्तेचे स्वरूप धारण करणारा असतो.
तिसरा सत्तेचा चेहरा मध्यममार्गी स्वरूपाचा असतो. या तीन प्रकारच्या सत्तेपैकी मध्यममार्गी व पुरोगामी सत्तेचा चेहरा मागे पडण्यास सुरुवात ऐंशीच्या दशकामध्ये झाली. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात राजकीय सत्तेचा उजवा चेहरा पुढे येण्यास सुरुवात झाली.
उजव्या प्रकारच्या पक्ष आणि संघटनांनी मध्यममार्गी व डाव्या प्रकारच्या सत्तेचा दावा करणाऱ्या पक्ष, संघटना आणि नेतृत्वावर समाजवाद व खोट्या धर्मनिरपेक्षतेचे आरोप केले. विशेषत: या दोन्हीही आरोपांमुळे मध्यममार्गी व डाव्या प्रकारच्या सत्तेचा दावा अस्थिर होण्यास सुरुवात झाली.
कारण याच काळात महाराष्ट्रीयन समाजामधील समाजवादी समाजाचे स्वप्न मागे पडत चालले होते. त्या ऐवजी व्यक्तिवाद या नवीन विचारसरणीचा उदय झाला होता. विशेषत: आर्थिक स्वरूपाचा व्यक्तिवाद हा समाजामध्ये जलद गतीने पसरत होता. त्यामुळे समाजवादी समाजाचे स्वप्न त्यांना योग्य वाटत नव्हते.
याउलट देशाची प्रगती व व्यक्तिगत प्रगती या गोष्टीचे स्वप्न समाजाला पडले होते. धर्मनिरपेक्ष ही संकल्पना देखील समाजातून बाजूला जाऊ लागली होती. विशेषत: विविध प्रकारच्या देवदेवतांची नवीन देवस्थाने उदयाला येत होती. पूर्वजांची पूजा करण्याच्या ऐवजी सरळ सरळ नवीन देवदेवतांनी ग्रामीण भागामध्ये धार्मिक वातावरण निर्माण केले होते.
यामुळे धर्मनिरपेक्षता हाच आपला खरा शत्रू आहे अशी भावना समाजात निर्माण झाली होती. त्यामुळे ओळखीमध्ये बदल झाला. विशेषत: धर्मावर आधारित ओळखी पुढे येऊ लागल्या. त्यामुळे वैज्ञानिक वातावरण मागे पडले. प्रगती धर्माच्या आधारे होते. प्रगती म्हणजे समाजवादाला नाकारणे होय अशा नव्या संकल्पना उदयास आल्या.
1980 नंतर 1985 पर्यंत समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक वातावरण या विरोधात फार मोठे वातावरण निर्माण झाले. या गोष्टींच्या विरोधात वातावरण निर्माण होणे म्हणजेच डावे किंवा पुरोगामी राजकारण मागे पडणे होय. तसेच काँग्रेसच्या विरोधात देखील हे वातावरण निर्माण झाले.
त्यामुळे काँग्रेसने हिंदू ही अस्मिता धारण करून राजकारण करण्यास सुरुवात केली. थोडक्यात काँग्रेस पक्ष मध्यममार्गी सत्तेच्या चेहऱ्याकडून हिंदू प्रकारच्या सत्तेच्या चेहऱ्याकडे वळला. 1985 नंतर हिंदू राजकारणही मागे पडले. त्या जागी संघटित हिंदुत्व अस्तित्वभान स्वीकारले गेले.
विशेषत: समाजामध्ये हिंदुत्वाबद्दलची एक नवीन लाट निर्माण झाली. संघाचे हिंदुत्व आणि सावरकरांचे हिंदुत्व या दोन्ही प्रकारच्या हिंदुत्वाचे एकत्रीकरण घडून आले. या प्रक्रियेमुळे हिंदुत्व शक्ती संघटित स्वरूपात प्रथमच सत्तेचा दावा करू लागली. हा बदल काँग्रेस पक्षाच्या व पुरोगामी पक्षांच्या लक्षात आला नाही.
काँग्रेस आणि पुरोगामी पक्षांनी हिंदुत्वाची चिकित्सा फार वरवरची केली. त्यामुळे एकूणच तिसरा सत्तेचा चेहरा उदयास येण्यासाठी मोठी पोकळी निर्माण झाली. त्या पोकळीमध्ये राजकीय सत्तेचा तिसरा चेहरा स्पष्टपणे दिसू लागला. अर्थातच सुरुवातीला त्या चेहऱ्याला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी आकार देण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नामुळे सत्तेचे दोन चेहरे मागे पडले. सत्तेचा तिसरा चेहरा पुढे आला.