For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपयशाला सामोरे जा, पण हार नका मानू

06:38 AM Nov 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपयशाला सामोरे जा  पण हार नका मानू
Advertisement

अभिनेते पद्मश्री अनुपम खेर यांचा सल्ला : इफ्फीत ‘पॉवर ऑफ फेलियर’ वर मास्टर क्लास

Advertisement

पणजी

आजच्या पिढीमधील अपयशाची भीती ही पालकांनी काढली तरच त्यांचे जीवन सुंदर होईल. अनेकजण अपयश आले तर लगेच खचतात. अपयश ही व्यक्ती नसून ती एक घटना आहे. त्यामुळे घाबरून न जाता त्यातून बाहेर येऊन पुढे कसे जाता येईल याचा विचार करावा. अपयशाला सामोरे जा  पण हार मानू नका, असा सल्ला  अभिनेते  पद्मश्री अनुपम खेर यांनी दिला. 55व्या इफ्फीमध्ये  ‘पॉवर ऑफ फेलियर’ या विषयावर आयोजित केलेल्या मास्टरक्लासमध्ये  खेर बोलत होते.

Advertisement

आपण गरीब घराण्यात जन्माला आलो. आमचे मोठे कुटूंब होते आणि कमावणारे कमी त्यामुळे काटकसर कऊनच आमचे घर चालायचे. पण तरीही सगळे आनंदी होते. त्यामुळे मला नेहमीच प्रश्न पडायचा की एवढे असूनही सर्वजण आनंदी कसे राहतात. याबद्दल मी जेव्हा  वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की जेव्हा माणूस गरीब असतो तेव्हा त्याला मिळणारी सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे आनंद. त्यामुळे आमच्याकडे जेवढे आहे त्याच्यात आनंदी राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही गोष्ट  माझ्या मनात घर कऊन राहिली.

गरीब असल्यामुळे आपले शिक्षण हिंदी माध्यमात झाले. पाचवी इंग्रजी माध्यम शाळा होती. तेव्हापासून हिंदी माध्यमात शिकलेली मुले यांना दुय्यम मानले जात होते. त्यांना इंग्रजी येत नाही अशी वागणूक  दिली जात होती आणि अजूनही दिली जाते. हे  मोडीत काढण्याचा आपण प्रयत्न सध्या करत आहे. मी प्रत्येक अपयशाची यशोगाथा आहे, असे अभिमानाने अनुपम खेर यांनी सांगितले.

जेव्हा आपण आपल्या जीवनाला चित्रपटातील कथेप्रमाणे पाहतो तेव्हाच यशोगाथा तयार होते. लहानपणी वेगवेगळ्या स्पर्धा नाटकांमध्ये काम करायचो. स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण कशी करता येईल यासाठी धडपडायचो. काही काळ तर मी शिक्षकांच्या आजूबाजूच्या लोकांच्या नकला करायचो.  अपयशाची भीतीही होतीच परंतु वडिलांनी अपयशीची भीती माझ्यातून काढली होती.  वडिलांमुळेच अपयश पचवायला शिकलो. लहानपणापासून मी जे काही केले त्यात मला जास्त यश मिळाले नाही. पण वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. कधीच रागावले की मारले नाही. उलट प्रयत्न केल्यामुळे त्यांनी मला पुष्पगुच्छ आणून दिला. दहावीत नापास झालो तेव्हा तर मी आणि बाबांनी लहान पार्टी देखील केली. यात महत्त्वाचे म्हणजे अपयश कसे साजरे करावे हे त्यांनी मला दाखवले. आपल्या आयुष्यात मोठ्या घडामोडी होतात त्या नक्कीच अविस्मरणीय राहतात. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट साजरी करतो ती सुंदर होते.

यश हे एकमितीय आहे पण अपयश हे बहुआयामी आहे. आयुष्यात अपयश आले  तर न खचता प्रयत्न करत नवीन गोष्टी करण्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आपले जीवन चित्रपटाच्या कथेप्रमाणे पाहण्याची गरज आहे आणि जीवनाचा हा चित्रपट कसा ब्लॉकबस्टर होणार यावर भर दिला पाहीजे. कारण कुणालाच अपयशी जीवन घालवण्याची इच्छा नसते. मी  जीवनाला एखाद्या चित्रपटाची कथाच असल्यासारखे जगत आलो आहे, म्हणून कदाचित मी यशस्वी होऊ शकलो, अस अनुपम खेर यांनी सांगितले.

तो जन्मजात कलाकार आहे, असे आपण अनेकदा कुणीतरी सांगताना ऐकले आहे, पण यात काहीच तथ्य नाही. कुणीच जन्मजात कलाकार नसतो. कलाकार हा आयुष्यातील अनुभवातून घडत असतो.  लहानपणी शाळेच्या एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकामुळे वडिलांची कौतुकाची थाप पडली यातून अभिनयाची आवड निर्माण झाली आणि मी या क्षेत्रात पोहचलो. जेव्हा मुंबईत गेलो तेव्हा मला काम मिळणे कठीण झाले.  शिक्षित असूनदेखील काम मिळत नसल्याचा जो अपमान होता तो मनाला बोचत होता. तरीही न खचता या क्षेत्रात पुढे आलो. अपयशामुळे त्रास होतो पण त्याबद्दल हार मानू नये.  जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदला, असा संदेश खेर यांनी दिला.

Advertisement
Tags :

.