डिएगो गार्सियात एफ-16, इस्रायलमध्ये एफ-22
विदेशमंत्री रुबियोंकडून ‘गँग ऑफ 8’ला ब्रीफिंग : इराणवरील हल्ल्याच्या हालचालींना वेग
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी इराणसोबत जारी तणावावरून अमेरिकेच्या खासदारांना माहिती दिली आहे. मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांना तैनात केले आहे. अमेरिकेचे एफ-22 लढाऊ विमान इस्रायलमध्ये वायुतळांवर तैनात करण्यात आले आहे. तर एफ-16 लढाऊ विमानांना हिंदी महासागरातील डिएगो गार्सियामध्ये तैनात करण्यात आले आहे. हिंदी महासागरात इराणच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
विदेशमंत्री मार्के रुबियो यांनी खासदारांचा समूह ‘गँग ऑफ 8’ला एक दुर्लभ इंटेलिजेन्स ब्रीफिंग दिले असून यात प्रतिनिधीगृह आणि सिनेटमधील दोन्ही पक्षांचे वरिष्ठ तसेच सिनेट इंटेलिजेन्स समित्यांचे प्रमुख आणि सदस्य सामील होते. परंतु या ब्रीफिंगमध्ये काय सांगण्यात आले हे गोपनीय ठेवण्यात आले आहे. परंतु इराणवर आता हल्ल्याची शक्यता खरी ठरणार असल्याचे मानले जात आहे.
गँग ऑफ 8 ला माहिती देण्याचा अर्थ
‘गँग ऑफ 8’ला व्हाइट हाउसकडून ब्रीफिंगदरम्यान अत्यंत संवेदनशील आणि गुप्तचर इनपूट दिले जातात, ज्यात सैन्यअभियानावरून माहिती असते. यापूर्वी 5 जानेवारी रोजी मार्को रुबियो यांनी ‘गँग ऑफ 8’ला माहिती दिली होती आणि याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. सीत्झर्लंडच्या जिनिव्हा येथे इराणसोबत गुरुवारी बैठक प्रस्तावित असताना ब्रीफिंग पार पडले आहे. इराणला स्वत:चा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम बंद करावा लागेल असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तर इराणने याला स्पष्ट नकार दिला आहे. तर यापूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना इराणचा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची भूमिका मांडली होती.
इराणला अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा वेढा
अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणला चहुबाजूने घेरले आहे. अमेरिकेच्या वायुदलाची लढाऊ विमाने सातत्याने मध्यपूर्वेत पोहोचत आहेत. अमेरिकेच्या वायुदलाचे तेल टँकर आणि ट्रान्सपोर्ट ट्रान्सअटलांटिक फ्लाइट्सही सातत्याने मध्यपूर्वेत दाखल होत आहेत. चालू आठवड्याच्या प्रारंभी पूर्व भूमध्य समुद्रात पोहोचलेली दुसरी विमानवाहू युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर. फोर्डसोबत एफ-22 देखील थिएटरमध्ये आले आहेत. स्टेल्थ जेट्सनी इंग्लंडमधील आरएएफ लॅकेनहीथ येथून बुधवारी उ•ाण केले होते. ही लढाऊ विमाने आता इस्रायलच्या ओवडा तळावर पोहोचली आहेत.
इस्रायलही हल्ल्यात भाग घेणार
इस्रायलमध्ये एफ-22 लढाऊ विमानांसोबत केसी-135 स्ट्रॅटोटँकर्स पोहोचल्याने इराण विरोधातील कुठल्याही संभाव्य हल्ल्यात इस्रायल सामील होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचबरोबर स्वत:च्या हवाईहद्दीचा इराणवर हल्ला करण्यासाठी वापर करू देण्याची अनुमती अनेक देश अमेरिकेला नाकारण्याची शक्यता आहे. तर हिंदी महासागरातील डिएगो गार्सियाच्या तळावर विमाने जमा होत असून ती इराणविरोधी हवाई हल्ल्यांच्या अभियानासाठी आवश्यक ठरू शकतात.