रशियाच्या हल्ल्यात एफ-16 नष्ट
युक्रेनवर रशियाचा सर्वात मोठा हवाई हल्ला : इराणी ड्रोन्सद्वारे घडविले नुकसान
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचे सर्वात मोठे हवाई आक्रमण केले आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाकडून झालेला हा सर्वात मोठा एरियल स्ट्राइक आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या एफ-16 लढाऊ विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला असून लढाऊ विमान नष्ट झाले आहे. शनिवार-रविवारदरम्यान रशियाने युक्रेनवर 537 शस्त्रास्त्रांनी हवाई आक्रमण केले. यातील 477 ड्रोन्स होती तर 60 क्षेपणास्त्रs होती. या रशियन हल्ल्यांना उधळून लावण्याच्या प्रयत्नादरम्यान एफ-16 विमानाचा वैमानिक मकस्यीम उस्तेमेंको हे हुतात्मा झाल्याची माहिती अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी दिली आहे.
एफ-16च्या वैमानिकाने 7 हवाई लक्ष्यांना नष्ट केले होते. वैमानिकाचा परिवार आणि सहकाऱ्यांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. वैमानिकाच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल चौकशी करण्याचा निर्देश दिल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले. युक्रेनने या युद्धात आतापर्यंत तीन एफ-16 लढाऊ विमाने गमाविली आहेत. रशियाचा हा हल्ला युक्रेनच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचा कमकुवतपणाही दाखवून देत आहे. युक्रेनला अमेरिका आणि नाटोकडून एफ-16 लढाऊ विमाने मिळाली होती.
रशियाने इराणकडून निर्मित ‘शाहेद ड्रोन्स’द्वारे हवाई हल्ले केले आहेत. रशियन सैन्य युक्रेनच्या लोकांना लक्ष्य करत आहे. स्मिला येथे एका नागरी इमारतीला लक्ष्य करण्यात आले असून यात एक मुलगा जखमी झाल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले आहे.
युक्रेनच्या वायुदलाने 249 ड्रोन्सना इंटरसेप्ट करत नष्ट केले. या ड्रोन्सना कथित स्वरुपात इलेक्ट्रॉनिकली स्वरुपात जाम करण्यात आले. युक्रेनने ड्रोन्सला इंटरसेप्ट केल्याचा दावा केला असला तरीही युक्रेनच्या पायाभूत सुविधांना मोठे नुकसान पोहोचले आहे.
रशियाकडुन रात्रभर करण्यात आलेला हल्ला हा सर्वात मोठा हवाई हल्ला होता, ज्यात ड्रोन्स आणि विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांना सामील करण्यात आले होते. या हल्ल्यात युक्रेनच्या पाश्चिमात्य भागासह पूर्ण क्षेत्राला लक्ष्य करण्यात आले होते, अशी माहिती युक्रेनच्या वायुदलाचे संचार प्रमुख यूरी इहनात यांनी दिली आहे.
रशियाने या हवाई हल्ल्यांकरता ओलेन्या वायुतळावरून तीन टीयू-95 बॉम्बवर्षक विमाने रवाना केली होती. यानंतर रशियाच्या निजनी नोवगोरोड त्रेत्रातून मिग-31 के लढाऊविमानाने उ•ाण करत युक्रेनला लक्ष्य केले होते. हे लढाऊ विमान किंजलसारखे हायपरसोनिक क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.