नेत्रोत्सव
यंदा मे महिन्यातच पावसाळा सुरु झाला होता. हवामान विभागाचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत पण सर्वाचे सार आहे यंदा पाऊस चांगला आहे. खरेतर पाऊस चांगलाच हवा, पावसाचे तडाखे कुठं कुणाला लागू नयेत अशी सर्वस्तरातून प्रार्थना असते पण तसे घडताना दिसत नाही. कुठं धुडगूस, कुठं वादळ तर कुठं ढगफुटी, कुठं दुष्काळ तर कुठं महापूर आणि नुसती दाणादाण. निसर्गाचे हे रौद्र रुप आपणच आपल्या हातांनी ओढवून घेतलंय आणि पर्यावरणाच्या सर्व सूचना, संकेत दूर सारत नवनव्या समस्या ओढवून घेत आहोत. मुंबई तुंबली, बारामतीला ढगफुटी, भीमाशंकरला विक्रमी पाऊस, भीमेला महापूर, हाता तोंडाशी आलेलं पिक मातीमोल झाले वगैरे बातम्या नित्याच्या झाल्या. कधी पाऊस, कधी तापमान तर कधी गोठवून टाकणारी थंडी किंवा धडकी भरवणारी महामारी हे सगळं सुरुच आहे. यात भर म्हणून जंगलातील श्वापदे मानवी वस्तीत वावरताना दिसत आहेत, तर काही नामशेष होत आहेत, जंगली श्वापदे मानवी वस्तीत की माणूस या प्राण्यांच्या आधिवासात घुसतोय हा कळीचा मुद्दा आहे. प्राणीमित्र संघटना, कायदे आहेत पण मोकाट कुत्र्यांचा बालकावर हल्ला आणि बिबट्याने शेळी पळवली या बातम्या घाबरवून सोडतात, असा सगळा बिघडत असलेला सृष्टीचा मेळ वाकुल्या दाखवत असताना एखादे सुखचित्र नजरेसमोर येते जणू तो नेत्रोत्सव ठरावा. सृष्टीत प्रत्येक लहान सहान प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती याचं वेगळं महत्त्व असतं. अगदी सुक्ष्म आणि अल्पजीवी कीटकांनाही वेगळं सौंदर्य आणि आगळं वैशिष्ट्या असते. त्यामुळे एक आगळा वेगळा आनंद गवसतो. गेले चार सहा दिवस सांगली जिह्यातील चांदोली अभयारण्यातील चमचमणारे काजवे हे आगळेवेगळे विलोभनीय आणि वैशिष्ट्यापूर्ण ठरले आहेत, हे काजवे बघण्यासाठी चांदोलीला गर्दी होते आहे. फार मागे नाही पण दोन तपापूर्वी काजवे हे सर्वत्र दिसत. गावोगावी, डोंगरावर, पाणथळ जागेत रात्रीच्या अंधारात चमकणारा काजव्याचा चमचमाट दिसत असे. मानवी वस्ती वाढली, झाडे झुडपे कमी झाली, कीटकनाशकांचा वापर वाढला आणि आपण एक एक आनंद हरवत चाललो. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात काजव्यांचं शुटिंग झालं आणि हा नेत्रोत्सव प्रेक्षकांना बघता आला आहे. साताऱ्यात कास पठारावर फुलोत्सव भरतो, विविधरंगी फुलांनी सजलेली धरती, डोंगर बघण्यासाठी हजारो पर्यटक येतात. आता काजवा उत्सवही पुरेशी काळजी घेऊन पर्यटकांसाठी भरवणे शक्य आहे. तसा तो भंडारदरा वगैरे भागांत भरतोही पण पश्चिम महाराष्ट्रात चांदोली धरण परिसरात हिरवे डोंगर, दाट झाडी आणि छोटे मोठे नैसर्गिक धबधबे जोडीला रात्री काजव्यांचा नजारा, डोळ्यांचे पारणे फिटते. मन आनंदाने भरुन येतं आणि निसर्गाच्या किमयेपुढे नतमस्तक होते. जगभर पर्यटन उद्योग झपाट्याने विकसित होतो आहे. शासकीय पातळीवर त्यासाठी प्रयत्न सुरू असतात. धार्मिक पर्यटन जसे विस्तारते आहे तसे निसर्ग व ऐतिहासिक स्थळ पर्यटनही आकर्षण आहे. शासनाने कॅसलरॉकमध्ये आढळणारी फुलपाखरे, चांदोलीत आढळणारा काजव्यांचा नजारा आणि कास पठारावर आढळणारा फुलोत्सव, जोडीला महाबळेश्वर, कोयना, वारणा धरणे, चांदोली, सागरेश्वर अशी अभयारण्ये व सह्याद्रीच्या रांगा, गडकोट यांचा पर्यटन वाढीच्या दृष्टीने यथायोग्य असा विकास केला पाहिजे. या परिसरात आगळीवेगळी कलरची फुले, तांबडा-पांढरा रस्सा, मोदक, पुरणपोळी, बाकरवडी, भडंग खाद्य संस्कृती आहे. त्याचाही या उद्योगात उपयोग होऊ शकतो. शासनाने पुढील वर्षापासून चांदोलीत काजवा महोत्सव भरवावा आणि पर्यटकांना सोयीसुविधा देऊन निमंत्रण द्यावे. लोकांनी आता पारंपरिक व्यवसायासोबत अर्थार्जनांचे नवे मार्ग रुंदावले पाहिजेत, खरे तर काजवा हा छोटा कीटक आहे. त्याचे स्वप्रकाशीत चमकणे हे जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी असते, मिलनासाठी असते. काजवा हा प्रकाश टाकणारा किडा आहे. अधूनमधून किंवा एकसारखा प्रकाश देणारा एक कीटक. कोलिऑप्टेरा गणाच्या भुंग्याच्या (लॅपिरिडी) कुलात याचा समावेश होतो. काजवा निशाचर भुंगा आहे. त्याच्या 2,000 जाती असून अंटार्क्टिका खंड वगळता हा कीटक सर्व खंडांवर आढळतो. अगदी थोड्याच काजव्यांच्या बाबतीत अंडी, अळी, कोश व प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थांत प्रकाशाची उत्पत्ती होते, तथापि बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात. काजव्यांच्या चमचमण्यात विविधता आहे पण काजवे लुप्त होत चालले आहेत. माणूस हा असा प्राणी आहे की तो सर्व गोष्टींचा नाश करून त्याच्या नोटा बनवतो. मूळासकट त्याला खायची सवय आहे. त्यामुळेच काजवे दिसणं, त्यांचं लकलुकणे दुरापास्त झाले आहे. काजवे हे लांब व मऊ शरीराचे असून रंगाने मंद काळसर, पिवळे किंवा तांबूस असतात. नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. काजव्यांचे एक वैशिष्ट्या म्हणजे त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. एकुण आठ दहा दिवसच त्यांचं लुकलुकणं आणि अंडी घालून जीवन संपवणं असतं. वर्षभराने पुन्हा ते दिसतात. आपले कार्य करतात आणि संपतात. निसर्गाची ही विविधता जपली पाहिजे. काजव्यासाठी पाणथळ, डोंगरी, अंधारी निर्मनुष्य जंगले जपली पाहिजेत आणि सुरक्षितपणे काजवा महोत्सवही भरवला पाहिजे. अन्यथा डायनासोर हा भीमकाय प्राणी जसा नष्ट झाला तसा काजवाही नष्ट होईल आणि निसर्गाचा नेत्रोत्सव कुठेही आढळणार नाही.