डोळे दिपवणारं...लखलखणारं सोनं !
भारतीयांची आणि खास करून आपल्याकडील महिलांची सोन्याच्या दागिन्यांची हौस ही किती प्रचंड हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये... या पार्श्वभूमीवर रॉकेटवर स्वार झाल्याप्रमाणं उडू लागलेले सोन्याचे भाव सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारे असले, तरी त्यामुळं गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाणी सुटू लागलंय... सोनं यंदा 80 हजारांच्या पार गेलं असून त्याला आता 1 लाखाचा टप्पा खुणावू लागलाय. या पार्श्वभूमीवर मागील 25 वर्षांत सोन्याचे दर कसे डोके फिरविणारे ठरलेत अन् कोणते घटक त्यास कारणीभूत ठरतात यावर टाकलेला दृष्टिक्षेप...
जगभरातील महिलांच्या अत्यंत आवडत्या, परंतु सर्वसामान्यांना निराश करणाऱ्या पिवळ्या धातूनं म्हणजेच सोन्यानं बुधवारी वरच्या दिशेनं पुन्हा एकदा जबरदस्त झेप घेतली आणि नोंदविला इतिहासातील विक्रम...त्या दिवशी आंतरराष्ट्रीय ‘स्पॉट बाजारपेठे’त भाव होता प्रति औंस (28.34 ग्रॅम) 2 हजार 883 डॉलर्स...त्यामागं महत्त्वाचं कारण लपलं होतं ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची विविध राष्ट्रांना दिलेली कर बसविण्याची धमकी अन् भूराजकीय परिस्थिती यात. या वातावरणामुळं साऱ्या जगभरातल्या पिवळ्या धातूच्या किमतींनी झपकन उसळी घेतली. भारताचा विचार केल्यास ते पोहोचलं प्रति 10 ग्रॅम 85 हजार रुपयांवर (24 कॅरेट सोनं, आयात शुल्क व विविध करांशिवाय)...
रुपयाची देखील मोठ्या प्रमाणात सध्या घसरण चालू असल्यानं सोन्याची शक्ती भलतीच वाढलीय. त्या दिवशी दिल्ली मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या ‘स्पॉट’ किमतीनं प्रति 10 ग्रँम वा प्रति तोळा 86 हजार 150 रुपयांच्या स्तराला धडक देण्याचा पराक्रम नोंदविला (जीएसटीशिवाय). राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांच्या पोटात व्यापार युद्धाच्या भीतीनं अक्षरश: गोळा आलाय. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना सोनं म्हणजे स्वर्गच वाटू लागलाय...या क्षेत्रातील तज्ञांच्या अंदाजानुसार, भविष्यातील चार ते पाच महिन्यांत सोनं प्रति 10 ग्रॅम 89 ते 92 हजार रुपयांना सहज स्पर्श करेल...
का वाढतात सोन्याच्या किमती ?
सोन्याच्या दरात वाढ होण्यामागं अनेक घटक कारणीभूत असतात...कोणत्याही इतर वस्तूप्रमाणं हे भावही पुरवठा नि मागणीमुळं प्रभावित होतात. खाण उत्पादनातील बदल, फेरप्रक्रियेचे दर आणि औद्योगिक मागणी बाजारातील सोन्याची उपलब्धता निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात...त्याशिवाय मध्यवर्ती बँकांची धोरणं काही कमी वाटा उचलत नाहीत. मध्यवर्ती बँकांमध्ये सोन्याचे लक्षणीय साठे असतात. त्यांच्याकडून होणारी खरेदी किंवा विक्री यामुळं किमतीवर परिणाम होऊ शकतो. व्याजदराविषयीच्या निर्णयासारखी पतधोरणं सुद्धा सोन्याकडील गुंतवणूकदारांचा कल निश्चित करतात...
सोन्याकडे महागाईविरुद्धची ढाल म्हणून पाहिलं जातं. कारण चलनाच्या अवमूल्यनाच्या काळात त्याचं मूल्य वाढतं. याउलट चलनवाढीच्या काळात सोन्याचं आकर्षण कमी होऊ शकतं. कारण गुंतवणूकदार अधिक स्थिर परतावा मिळू शकणाऱ्या मालमत्तांकडे वळतात...सोन्याची किंमत ही मुळात अमेरिकन डॉलरमध्ये असते. म्हणून डॉलरच्या तुलनेत प्रमुख चलनांच्या मूल्यातील हेलकावे सोन्यावर परिणाम करू शकतात. कमकुवत डॉलर सामान्यत: सोन्याच्या किमती वाढवतो, पण इतर चलनं पदरी असलेल्या गुंतवणूकदारांना हा धातू अधिक परवडणारा बनतो...
राजकीय अस्थिरता, संघर्ष नि भूराजकीय तणाव सोन्याची मागणी वाढवू शकतात. अनेकदा अशांत काळात जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता गुंतवणूकदारांना सोन्याकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरते...सोने हे रोखे व बचत खात्यांसारख्या व्याज देणाऱ्या गुंतवणुकींशी स्पर्धा करत असते. त्यामुळं व्याजदरांमधील बदलाचा गुंतवणूकदारांच्या मागणीवर परिणाम होतो....गुंतवणूकदारांच्या भावना आणि अंदाजावर आधारित व्यवहार यांचाही सोन्याच्या भावावर अल्पकालीन असला, तरी लक्षणीय परिणाम होऊ शकतो...
घटना-घडामोडी, बातम्या, बाजारातील अफवा तसंच जोखमीच्या मालमत्तांकडील कल हे सर्व चढउतार आणू शकतात...सोन्याचे उद्योगविश्वात विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत विविध उपयोग आहेत. काही उद्योगांमधील सोन्याची मागणी कमी करणाऱ्या तांत्रिक प्रगतीमुळं किमतीवर परिणाम होऊ शकत असला, तरी औद्योगिक मागणी ही सामान्यत: गुंतवणूक आणि दागिन्यांच्या मागणीपेक्षा कमी भूमिका बजावते...
सोन्याचा विक्रमी धूर...
? भारतानं 2024 मध्ये 5 टक्क्यांच्या वृद्धीसह जवळपास 802 टन सोन्याची आयात केली, तर गुंतवणूक व विविध उत्सवांमुळं सोन्याच्या दागिन्यांची सुमारे 563.4 टन इतकी विक्री झाली. हा आकडा मोठा वाटत असला, तरी तो 2023 च्या तुलनेत दोन टक्के कमीच...
? भारतीय स्त्रियांच्या मुठीत विश्वातील सर्वांत जास्त म्हणजे चक्क 24 हजार टन सोनं असून हे प्रमाण जगातील सोन्याच्या साठ्याच्या 11 टक्के इतकं भरतं. पहिल्या पाच देशांकडील सोन्याचा साठा एकत्र केला, तरी तो त्यापुढं अपुराच...
? 2023 वर्षाशी तुलना केली, तर गतवर्षीचा डिसेंबर महिना संपला तेव्हा सोन्यावर दिलेलं कर्ज वाढलं होतं ते तब्बल 71 टक्क्यांनी. वैयक्तिक कर्जांच्या विभागाचा विचार केल्यास त्याचं वर्णन ‘फास्टेस्ट ग्रोईंग’ असं करावं लागेल...
? कायम ठेवींवर व समभागांवर घेतलेल्या कर्जांत डिसेंबर, 2023 पेक्षा डिसेंबर, 2024 मध्ये वृद्धी झाली होती ती अनुक्रमे 19 व 22 टक्क्यांची. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, 27 डिसेंबरपर्यंत बँकांनी सोन्यावर कर्ज दिलं होतं ते 1.7 लाख कोटी रुपयांचं. 2023 मधील वृद्धी 68.3 टक्के इतकी होती...
? विश्लेषक तीन कारणांमुळं ही वाढ झालीय असं मानतात. त्यातील सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बिगरबँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांकडून (एनबीएफसी) ग्राहक वळले ते बँकांच्या दिशेनं. मग बँकांनी ताबा मिळविला तो 82 टक्के हिश्श्यावर., तर ‘एनबीएफसी’च्या हातात शिल्लक राहिला तो केवळ 18 टक्के वाटा...
? दुसरं कारण म्हणजे कर्जदाराला सध्याच्या भावामुळं जास्त पैसे मिळविणं शक्य झालंय...आणि तिसरी बाब : कर्जांत बुडालेल्या व्यक्तीनं जास्तीत जास्त आधार घेतलाय तो सोन्याचाच...
? वैयक्तिक कर्जांचा विचार केल्यास क्रेडिट कार्ड 15.6 टक्क्यांच्या वृद्धीसह पोहोचलं 2.9 लाख कोटी रुपयांवर, पण नेहमीप्रमाणं बाजी मारली ती ‘गृहकर्जा’नं. त्यासाठी बँकांनी ओतले 29.3 लाख कोटी रुपये. मात्र वाढीचा दर राहिला 11.1 टक्के...
सोन्याच्या भावांची 2000 ते 2010 पर्यंत वाटचाल...
वर्ष 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
2000 4 हजार 400 रु.
2001 4 हजार 300 रु.
2002 4 हजार 990 रु.
2003 5 हजार 600 रु.
2004 6 हजार 307 रु.
2005 7 हजार 638 रु.
2006 9 हजार 265 रु.
2007 10 हजार 598 रु. (पहिल्यादाच 10 हजारच्या पार)
2008 13 हजार 630 रु.
2009 16 हजार 686 रु.
2010 20 हजार 728 रु. (पहिल्यांदाच 20 हजारच्या पार)
2011 ते 2020 पर्यंतचा प्रवास...
वर्ष 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
2011 27 हजार 329 रु.
2012 30 हजार 859 रु. (प्रथमच 30 हजारच्या पार)
2013 28 हजार 422 रु.
2014 26 हजार 703 रु.
2015 24 हजार 931 रु.
2016 27 हजार 445 रु.
2017 29 हजार 156 रु.
2018 31 हजार 391 रु.
2019 39 हजार 108 रु.
2020 50 हजार 151 रु. (पहिल्यांदाच 50 हजारच्या पार)
मागील 5 वर्षांतील सोन्याची उसळी...
वर्ष 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
2021 48 हजार 99 रु.
2022 55 हजार 17 रु.
2023 63 हजार 203 रु.
2024 78 हजार 245 रु.
14 जानेवारी 2025 80 हजार 210 रु. (प्रथमच 80 हजारच्या पार)
5 फेब्रुवारी 2025 86 हजार 150 रु.
विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे असलेला सोन्याचा साठा...
देश साठा
अमेरिका 8 हजार 133 टन
जर्मनी 3 हजार 352 टन
इटली 2 हजार 452 टन
फ्रान्स 2 हजार 437 टन
रशिया 2 हजार 336 टन
चीन 2 हजार 280 टन
स्वीत्झर्लंड 1 हजार 40 टन
भारत 876 टन
जपान 846 टन
तुर्की 615 टन
संकलन : राजू प्रभू