For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात लक्षवेधी मुकाबला

06:45 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
रायगड  रत्नागिरी सिंधुदुर्गात लक्षवेधी मुकाबला
Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे प्रचाराचे काम जोरदारपणे सुरू आह़े रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात तगडी लढत होण्याची चिन्हे आहेत़ त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यातील मुकाबला रोचक ठरणार आह़े महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये असलेला संघर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसून येत आह़े प्रचारासाठी सभा, भाषणे यांच्यासोबत वेगवेगळ्या रणनितीच्या चाली महत्त्वाच्या ठरत आहेत़

Advertisement

शिवसेनेचे (उबाठा) नेते अनंत गीते 1996 पासून 2019 पर्यंत खासदार होते. त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषविले आह़े त्यांना राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचा समजला जाणारा संसदीय कामकाजाचा अनुभव आह़े त्यांच्या विरोधात महायुतीने सुनील तटकरे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला उतरविले आह़े रायगडच्या राजकारणात तटकरेंना वगळून कोणतीच राजकीय योजना पुढे जाणे अवघड ठरावे, असे स्थान त्यांनी निर्माण केले आह़े राज्यात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळलेले मंत्री म्हणूनही त्यांची ओळख आह़े वक्तृत्वाच्या बाबतीतही कोणालाही हार न जाणारे नेते म्हणून रायगडात त्यांची ख्याती आह़े महायुती आणि महाविकास आघाडी यांनी उमेदवार निवड करताना प्रतिस्पर्ध्याला तोडीस तोड ठरेल अशी काळजी घेतली आह़े

रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण येथे रवीशेठ पाटील हे भाजपचे आमदार असून महाडचे आमदार भरत गोगावले हे शिवसेना श्ंिादे गटाचे प्रतिनिधी आहेत़ श्रीवर्धनचे आमदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या आहेत़ अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे शिवसेना श्ंिादे गटाचे आहेत़ दापोलीचे आमदार योगेश कदम हे शिवसेना श्ंिादे गटाचे असून गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे शिवसेना ‘उबाठा’चे आहेत़ रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी पाच आमदार महायुतीसाठी काम करत आहेत़ तर महाआघाडीसाठी एक आमदार प्रचार मोहिमेत सहभागी झाले आहेत़ आमदारांची संख्या कमी अधिक असली तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल मतदार कशा स्वरुपात देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल़

Advertisement

गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचे ‘स्नेहसंबंध’ सर्वांना माहिती आहेत़ गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे झालेल्या प्रचार सभेला हे दोन्ही नेते उपस्थित होत़े आपल्या भाषणात अनंत गीते यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत मी तटकरेंविरोधात नाही, तर भास्कर जाधव यांच्या विरोधात लढलो. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले भास्कर जाधव यांनी भाषण सुरू असतानाच गीते यांना रोखल़े जाधव म्हणाले, “सॉरी, सॉरी गीतेसाहेब, पण मला असे वाटते की, तुम्ही हे बोलणं आता टाळलं पाहिजे. याचे कारण असे की तुमचे जे खाली चेले-चपाटे आहेत, ते वेगळ्या अर्थाने प्रचार करत आहेत. मी 2019 मध्ये ज्या पक्षाचा होतो, त्या पक्षाचे मी काम करत होतो. गीतेसाहेब, तुमच्या बोलण्यातून पेरणी अशी होते की, मी तुमच्याविरोधात होतो. त्यामुळे जमेल तर हे बदला की, भास्कर जाधव राष्ट्रवादीमध्ये होते. तटकरेंच्या बाजूने होते. मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही. मी त्याचा अनुभव चिपळूणमध्ये घेतला आह़े” त्यावर उमेदवार असलेले गीते यांनी “तटकरेंचे इथे (गुहागर मतदारसंघात) होते काय? आहे काय? जे काही राजकीय स्थान आहे, ते भास्करशेठचे. त्यामुळे लढत तटकरेंशी नसून भास्कर जाधवांशी झाली”, असे म्हणालो, असा खुलासा केल़ा गीते यांना जाधव यांनी रोखल्याने तो चर्चेचा विषय झाल़ा रायगड मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रचाराची चढाओढ असून मतदार नेमके कुणाच्या बाजूने उभे राहणार, हे निवडणूक निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आह़े रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाने काही संघटनात्मक नियुक्त्या ऐन निवडणुकीच्या तेंडावर केल्या आहेत़ पाच मेपर्यंत मतदारसंघात पूर्णवेळ मुक्कामी जाऊन प्रचार यंत्रणेत सुसूत्रता आणावी, यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चिपळूण विधानसभेसाठी नागपूर दक्षिणचे आमदार मोहन मते, रत्नागिरीसाठी राळेगाव विधानसभेचे आमदार, माजी मंत्री अशोक उईके, राजापूरसाठी विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांची निवड जाहीर केली आहे. तसेच कणकवली विधानसभेसाठी गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते, कुडाळसाठी वर्ध्याचे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सावंतवाडीसाठी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रचार यंत्रणेत कसर राहू नये, म्हणून भाजपने कनिष्ठ स्तरावर विशेष व्यक्तींची नेमणूक केली आह़े

एका बाजूला भाजपने नारायण राणे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला रिंगणात उतरवले असताना त्यांच्यासमोर दोनवेळा खासदार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या विनायक राऊत यांना उबाठा शिवसेनेने उभे केले आह़े राऊत यांचा विजय व्हावा म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: सभा घेत आहेत़ रत्नागिरीतील सभेत त्यांनी म्हटले की, कोकण हे शिवसेनेचे आणि ठाकरे कुटुंबियांचे हृदय आहे. गद्दारांनी शिवसेना फोडली, चोरली. गद्दारांकडे धनुष्यबाण चिन्ह गेलं. पण गद्दारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण कोकणातून गायब केलाय. दिल्लीत बसलेले गद्दारांचे मालक शिवसेनेचे कोकणशी असलेले नाते तोडू पाहताहेत. पण या षड्यंत्रात त्यांचीच वाटचाल विनाशाच्या दिशेने चालली आहे. नरेंद्र मोदींना मत द्या म्हणून सांगून आम्ही गेली दहा वर्षे फसलो. पण आता यांना तडीपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिवसेना खत्म करू पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर प्रचारसभेत केली. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात चिपळूण शेखर निकम (अजितदादा गट), रत्नागिरी उदय सामंत (शिंदे गट), राजापूर राजन साळवी (उद्धव ठाकरे गट), कणकवली नीतेश राणे (भाजप), मालवण वैभव नाईक (उद्धव ठाकरे गट), सावंतवाडी दीपक केसरकर (शिंदे गट) असे आमदार लोकसभा निवडणूक प्रचारात आहेत़

लोकप्रतिनिधी जरी वेगवेगळ्या स्तरावर उभे असले तरी मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आह़े

सुकांत चक्रदेव

Advertisement
Tags :

.