For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कामाच्या जागी डोळ्यांची काळजी’

09:51 AM Oct 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘कामाच्या जागी डोळ्यांची काळजी’
Advertisement

डोळ्यांच्या समस्यांबाबत जागरुक असणे अत्यंत आवश्यक

Advertisement

जगभरात 12 ऑक्टोबर हा दिवस जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी एक नवा विषय निवडला जातो. हा विषय डोळ्यांच्या निरनिराळ्या भागामध्ये उत्पन्न होणारे रोग, दोष आणि त्यांचे निवारण कसे करावे आणि डोळ्यांचे संरक्षण कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन करतो. रोगाचा प्रतिबंध करणे फार महत्त्वाचे, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे हा विषय सांगतो. आयएपीबी (अंधत्व प्रतिबंध करणारी जागतिक संस्था) ही संस्था हा विषय ठरविते आणि सर्वांना कळविते. यावर्षी ‘कामाच्या जागी डोळ्यांची काळजी’ हा विषय असून त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी या कामासाठी प्रयत्नशील असावे. यासाठी त्यांनी पुढे यावे या उद्देशाने नेत्रतज्ञ कार्यरत असतात. उद्योग क्षेत्रातील पुढाऱ्यांनी आपल्या कामगारांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांना निदान, उपाययोजना, उपचार पद्धती मिळाव्यात, त्याही समावेशक प्रकाराने उपलब्ध व्हाव्यात, असाही प्रयत्न सुरू आहे. कामगारांमध्ये पुढाकार घेऊन हे काम जोमाने व्हायला हवे. डोळ्यांची योग्य काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे, हे कामगारांना कळायला हवे जेणेकरून त्यांचे डोळे सुरक्षित राहतील. परिणामी डोळे चांगले राहतील. आपल्या स्वत:च्या आरोग्याला महत्त्व देणे ही पहिली पायरी. कारखान्यातील जमीन, ऑफिसची इमारत, स्टाफरुम, कामाची जागा या सर्व ठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सोय, ही सहज उपलब्ध होणारी, सहज मिळण्याजोगशी, सहज परवडणारी अशी असावी.

डोळ्यांची काळजी घेणे का महत्त्वाचे?

Advertisement

  • दिवसभरातील बराचसा काळ कामाच्या ठिकाणी जातो. आपले डोळे काम करण्यास योग्य अशा स्थितीत आणि कार्यक्षम हवेत.
  • पूर्वी ‘या व्यक्तीचे डोळे सक्षम आहेत’ एवढे सर्टिफिकेट नेत्रतज्ञाकडून मिळाले की पुरेसे होत असे. पण आजकाल कॉर्पोरेट क्षेत्र, सहकारी संस्था, इतर संस्था, उद्योगधंदे यासारख्या ठिकाणी नेत्रतज्ञांकडून सर्वसमावेशक अशी तपासणी करून सर्टिफिकेट आणावे, असा आग्रह असतो.
  • दृष्टी, रंग ओळखणे, संपूर्ण डोळा या साऱ्यांचे काम सक्षमपणे चालू आहे, याची खात्री करून घेतल्याने संपूर्ण क्षमतेने काम करण्याची खात्री मिळते.
  • आजकाल डिजिटल स्ट्रेन हा महत्त्वाचा पैलू बनू पाहत आहे. डोके दुखणे, डोळे दुखणे, चष्मा नंबर वाढणे या साऱ्यात डिजिटल स्ट्रेनने वाढ झाली आहे. म्हणून प्रत्येक वर्षी कामगारांच्या डोळ्यांची तपासणी आवश्यक आहे.
  • कारखाना, उद्योग क्षेत्र, कामाची जागा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. डोळ्यांना इजा होण्याची भीती असते. अपघातामुळे काही काळापुरते किंवा कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. अपघातामुळे डोळ्यांना गंभीर समस्या होऊ शकतात.
  • लहान मोठ्या जखमा, घर्षणामुळे खरचटल्यासारखे होणे
  • एखादा कण डोळ्यात गेल्याने उद्भवणारा त्रास
  • रसायन डोळ्यात गेल्यास आग होणे. अशावेळी डोळा ताबडतोब स्वच्छ पाण्याने धुवावा आणि नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
  • जखम झाली तर पाणी येते. काहीवेळा शस्त्रक्रिया गरजेची असते.
  • वेल्डिंग करताना बुब्बुळाला नुकसान पोहोचू शकते. डोळ्यांना 24 ते 28 तास प्रचंड वेदना होऊ शकतात. त्या 48 तासांनंतर कमी होतात. महत्त्वाचे हे की कायमचे नुकसान होत नाही.
  • डिजिटल स्ट्रेन हा आजकालचा सर्वात मोठा स्ट्रेन. टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यांना पर्याय नाही. म्हणूनच नेत्रतज्ञाकडून नियमित डोळे तपासून घेणे आवश्यक आहे. डिजिटल विकृती अनिवार्य होऊ नये यासाठी वेळेवर निदान, उपाय, उपचार फक्त नेत्रतज्ञच करू शकतात.

डोळ्यांबद्दल घ्यायची दक्षता

  • कृपया तुमच्या कामाच्या ठिकाणी विशेषत: कारखाने आणि उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांनी सुरक्षा गॉगल घालावा.
  • अपघात झाल्यास व्यवस्थापनास कळवा आणि त्वरित काळजी घ्या.

लोकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि डोळे वाचविता यावेत यासाठी या समस्यांबाबत जागरुक असणे अत्यंत आवश्यक आहे. या डोळ्यांच्या समस्यांबाबत नियोक्ता तसेच कर्मचाऱ्यांनी जागरुक असणे आवश्यक आहे.

- नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा कोडकणी, अयोध्यानगर व मारुती गल्ली

- शब्दांकन- आशा रतनजी

Advertisement
Tags :

.