रेशनमधील अतिरिक्त तांदळाला गैरप्रकाराची कीड
रेशन दुकानदारांकडूनही तांदळाची लूट
बेळगाव : दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून देण्यात येणाऱ्या अतिरिक्त रेशन तांदळामुळे काळाबाजार वाढला आहे. अतिरिक्त तांदूळ बेकायदेशीरपणे विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गोरगरीब जनतेला धान्य कमी पडू नये या उद्देशाने देण्यात येणाऱ्या रेशनच्या तांदळात गैरप्रकार वाढला आहे. अशा बेकायदेशीर तांदूळ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मासिक मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. फेब्रुवारी महिन्यापासून अतिरिक्त 5 किलो तांदूळ दिला जात आहे. त्यामुळे माणसी 10 किलो तांदळाचे वितरण होत आहे. मात्र या अतिरिक्त तांदूळ वाटपामुळे गैरप्रकार वाढले आहेत. रेशनचा मिळणारा तांदूळ खुल्या बाजारात विकला जात आहे. तर ग्रामीण भागात काही लाभार्थी 15 ते 20 रुपये किलो दराने हा तांदूळ विकत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
रेशन दुकानदारांकडूनही लूट
काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांकडूनच रेशन वितरणावेळी तांदूळ खरेदी करत आहेत. आणि हेच तांदूळ पुढे जादा दराने विकत आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांकडूनही तांदळाची लूट होत असल्याचे दिसत आहे. लाभार्थ्यांकडून 8 ते 10 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करणे आणि पुढे हा तांदूळ 15 ते 20 रुपये किलो दराने विकणे असे प्रकार वाढले आहेत. सरकार गोरगरीब जनतेला पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे यासाठी माणसी 10 किलो तांदूळ वितरीत करत आहे. मात्र याचा गैरफायदा वाढला आहे. त्याबरोबर लाभार्थी परस्पर तांदूळ विकत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे अन्नभाग्य योजनेतील रेशनला गैरप्रकाराची कीड लागली आहे.