खंडणीखोर महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
सातारा :
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला हा वाद मिटवून घेण्यासाठी एक कोटींची खंडणी स्वीकारताना शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. या महिलेला शनिवारी सातारा कोर्टात हजर केले असता तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप झाल्याने ऐन अधिवेशनादरम्यान, खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनीही या प्रकरणावरून मंत्री गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी हे जुने प्रकरण असून, या प्रकरणी कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते.
मात्र जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणामध्ये तडजोड करण्यासाठी संबंधित महिलेने 3 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार कॉँग्रेसचे विराज शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे केली. त्यानंतर शुक्रवारी यामधील एक कोटी रुपये घेताना या महिलेला अटक करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी संशयित महिलेला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पठाण यांच्यासमोर सातारा पोलिसांकडून हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने अॅड. बांदल यांनी, तर बचाव पक्षाच्यावतीने अॅड. नितीन गोडसे यांनी कामकाज पाहिले. बांदल यांनी याप्रकरणी 7 दिवसांची पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. या दोन्ही वकिलांचा जोरदार युक्तिवाद न्यायालयासमोर झाल्यानंतर न्या. पठाण यांनी संबंधित महिलेस दि. 24 पर्यंत कोठडी सुनावली आहे. तसेच याप्रकरणात शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.