For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊसतोड टोळ्या-वाहन चालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

10:45 AM Dec 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऊसतोड टोळ्या वाहन चालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक
Advertisement

टनाला 500 रुपये ऊसतोडणी-चालक एन्ट्री हजार रुपयांची शेतकऱ्यांकडून वसुली : खानापुरातील कारखान्याच्या संचालकांनी लक्ष घालण्याची मागणी

Advertisement

खानापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊसतोडणी मजूर आणि ट्रकचालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. तालुक्यातील शेतकरी अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि जंगली प्राण्यांच्या धुमाकूळामुळे मेटाकुटीला आला असताना ऊस कारखान्याच्या टोळ्यांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि संचालकांनी याबाबत तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तालुक्यात जवळजवळ 18 हजार हेक्टर जमिनीवर उसाची लागवड करण्यात येते.

उसाचे क्षेत्र मोठे असल्याने महाराष्ट्रातील आणि बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच तालुक्यातील एकमेव लैला साखर कारखाना तालुक्यातील उसाची उचल करतात. यावर्षी पावसामुळे ऊसतोडणी हंगाम लांबला असल्याने डिसेंबरच्या 10 तारखेनंतर तालुक्यात मोठ्याप्रमाणात ऊसतोड सुरू झाली आहे. मात्र साखर कारखान्याच्या ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली असून प्रती टनाला 500 रुपये वेगळी आकारणी करत आहेत. तसेच ट्रकचालक 1 हजार रु. ची इंन्ट्री घेत असल्याने शेतकऱ्याला एक ट्रकमागे 12 ते 13 हजार रुपये वाहतुकीचा खर्च येत आहे. अद्याप एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही.

Advertisement

कारखान्याच्या संचालकांच्याच टोळ्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे

कारखाने प्रती टनाला 365 रुपये ऊसतोडणी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून ऊसतोडणी करणारे 500 रुपये प्रती टनाला घेत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हंगाम लांबल्याने शेतकरी नाईलाजास्तव पैसे देऊन उसाची तोड करून वाहतूक करत आहेत. मात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्याच टोळ्या असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अतिरिक्त पैसे देण्यास नाकार दिल्यास ऊसतोडणी सोडून दुसरीकडे जात असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. ऊसतोड टोळी आणि ट्रकचालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी कचाट्यात सापडलेला आहे. ऊसतोडणी वेळेत झाली नाही तर पुढील ऊस पिकावर परिणाम होणार आहे. कारखान्याकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

वन्यप्राण्यांकडून नुकसान-ऊसतोड टोळ्यांकडून लुबाडणूक

यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भात पिकाच्या सुगी अजून लांबल्या आहेत. तसेच ऊसतोडही दीड महिना उशीरा सुरू झाली आहे. यातच हत्ती, गव्यांचे कळप व जंगली प्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेती नको अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वनखात्याकडून मिळणारी तटपुंजी नुकसानभरपाईसाठी कागदपत्रांची पूर्तता आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची सतावणूक यामुळे भरपाई नकोशी झाली आहे. अशातच ऊसतोडीसाठी मोठ्याप्रमाणात आर्थिक लुबाडणूक होत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र पडसाद उमटत आहेत.

कारखान्याने ऊस दर जाहीर करावा

तालुक्यातील शेतकरी अगोदरच पाऊस आणि वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे होरपळला आहे. यातच ऊसतोडणीसाठी चालक आणि ऊसटोळीकडून होत असलेली आर्थिक पिळवणूक यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही. प्रत्येक ट्रकमागे शेतकऱ्याला जवळपास 13 हजार रुपये खर्च येत आहे. साखर कारखान्यांनी अद्याप दरही जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. मात्र उसाची वेळेत तोड होणे गरजेचे असल्याने आर्थिक नुकसान सहन करून शेतकरी ऊसतोड करत आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या संस्थेने लैला कारखाना चालवण्यासाठी घेतलेला आहे. उसाचा दर जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांना त्यांनी तरी न्याय द्यावा, हीच अपेक्षा आहे.

-मऱ्याप्पा पाटील  

Advertisement
Tags :

.