साफयीस्ट कंपनीकडे मागितली खंडणी, आठजणांविरुद्ध गुन्हा
चिपळूण :
खडपोली येथील साफयीस्ट कंपनीत घुसून दमदाटी करीत खंडणी मागणाऱ्या गाणेतील आठ जणांवर शनिवारी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पावसाचे पाणी जाणारे गटारही बंद केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
निवृत्ती केशव गजमल, समीर गजमल, अमिल गजमल, शशिकांत गजमल व अन्य चार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र अनंत आंबेकर (59, रावतळे) यांनी दिली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, 21 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता निवृत्ती, समीर व अमिल हे कंपनीचे कामगार नसतानाही कंपनीत आले. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे काम न करता आम्हाला दरमहा 25 हजार रुपये द्यावे, 30 कंत्राटी कामगार पुरवठा करण्याचे कंत्राट मिळावे, कायमस्वरुपी 25 हजार रुपयांची नोकरी मिळावी अशा मागण्या केल्या. तसेच 22 रोजी सायंकाळी 6 वाजता वरील 4 व अन्य चार जणांनी कंपनीच्या आवारातील पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेले गटार दगड, मातीने बंद केले. तसेच कंपनीत शिरुन दमदाटी करत कंपनीचे पाणी बाहेर सोडायचे नाही अशी धमकी दिल्याचे नमूद केले आहे. यावरुन हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तपास सुरू
कंपनीचे व्यवस्थापक आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जणांवर खंडणीसह अन्य स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात बऱ्याच तांत्रिक बाबी असून त्याचा तपास सुरू आहे.
-भरत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ,अलोरे-शिरगाव पोलीस ठाण