ई-आस्थी नोंदीसाठी एजंटांकडून पिळवणूक
मालमत्ता नोंदणीसाठी अतिरिक्त रकमेची मागणी : थेट वॉर्ड बिल कलेक्टरशी संपर्क साधा
बेळगाव : महापालिकेने अधिकृत मिळकतींना ई-आस्थी प्रणाली सक्तीची केली आहे. परंतु, नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत एजंटांकडून ई-आस्थीसाठी पैसे उकळले जात आहेत. काही ठिकाणी हजार ते दोन हजार रुपयांची मागणी केली जात असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी एजंट अथवा इतरांशी संपर्क न साधता थेट वॉर्ड बिल कलेक्टरशी संपर्क साधून फसवणूक टाळावयाची आहे. मालमत्तांची विक्री करताना होणारी फसगत टाळण्यासाठी प्रत्येक मिळकतीची ई-आस्थी प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी मिळकतधारकाचा कर भरणा पावती, सिटी सर्व्हे उतारे अथवा गावठाण उतारे तसेच इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. या प्रणालीसाठी कोणताही मोठा खर्च येत नसतानाही नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत काही जण अधिकाऱ्यांची नावे पुढे करत पैसे वसूल करत आहेत.
पैसे वसुलीला आळा घालणे गरजेचे
ई-आस्थी नोंदणीसाठी हजार ते दोन हजार रुपये मागितले जात आहेत. त्यामुळे महापालिकेकडून ई-आस्थी नोंदणी नेमकी कोणाकडे करावी? त्यासाठी लागणारे शुल्क किती? यासंबंधी जागृती होणे आवश्यक आहे. काही एजंट मंडळी महापालिकेत आलेल्या नागरिकांना गाठून त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या वॉर्डमधील बिल कलेक्टरशी संपर्क साधून त्यांच्याकडे कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.
पीआयडीचे काम बंद झाल्याने एजंट ई-आस्थीच्या मागे
अनधिकृत वसाहतींमधील नवीन मिळकतींना पीआयडी नंबर देणे महापालिकेने बंद केले आहे. यापूर्वी पीआयडी नंबर मिळवून देण्यासाठी अनेक एजंट कार्यरत होते. एका पीआयडीसाठी तब्बल 15 ते 20 हजार रुपये घेण्यात येत होते. परंतु, सध्या पीआयडीचे काम बंद ठेवण्यात आल्याने या एजंटांनी आता ई-आस्थीकडे आपला मोर्चा वळविला आहे.