राज्योत्सव मिरवणुकीसाठी व्यापक बंदोबस्त
3 हजारहून अधिक अधिकारी-पोलिसांची नियुक्ती, सकाळपासूनच वाहतुकीवर बंदी
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारी होणाऱ्या राज्योत्सव मिरवणूक बंदोबस्तासाठी 3 हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून शनिवारी पोलीस परजिल्ह्यातूनही बंदोबस्तासाठी बेळगावात दाखल झाले. पोलीस परेड मैदानावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस आयुक्त प्रकाश निकम, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना मार्गदर्शन करीत संयमाचे धडे दिले. महाराष्ट्र एकीकरण समितीची निषेध फेरी व राज्योत्सव मिरवणूक या दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बंदोबस्तासाठी 3 डीसीपी, 6 एसीपी, 20 पोलीस निरीक्षक, 98 उपनिरीक्षक व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 528 हवालदार व पोलीस, परजिल्ह्यातून 8 पोलीस उपअधीक्षक, 48 निरीक्षक, 2006 उपनिरीक्षक व साहाय्यक उपनिरीक्षक, 1270 हवालदार व पोलीस, 400 होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या 10 व सीएआरच्या 8 तुकड्या असणार आहेत.
संपूर्ण शहरातील 25 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मिरवणुकीवर नजर असणार आहे. यासाठी 540 कॅमेरे नव्याने लावण्यात आले आहेत. अँटीस्टॅबिंग स्क्वॉड, अँटी ड्रग्ज स्क्वॉड, गुंडा प्रतिबंधक दल कार्यरत असणार असून सोशल मीडियावर 13 पथकांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीत 12 पुशअप व पिकअप स्क्वॉड असणार आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डीजेच्या आवाजावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरातील अवजड वाहतूकही रविवारी सकाळपासूनच बंद करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली असून पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत.
