For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधात निर्णयाला कालावधीवाढ

06:32 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधात निर्णयाला कालावधीवाढ
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधात निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पंधरा दिवसांची कालावधीवाढ दिली आहे. हा निर्णय 31 जानेवारीपर्यंत देण्याचा आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, तेवढ्या कालावधीत सर्व कामकाज संपणे शक्य नसल्याने नार्वेकर यांनी ही वाढ मागितली होती.

राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंबंधीच्या अशाच प्रकरणात 10 जानेवारी 2024 या दिवशी त्यांचा निर्णय दिला होता. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निर्वाळा त्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे कोणताही आमदार अपात्र ठरत नाही, असा निर्णयही त्यांनी त्याच निर्णयपत्राद्वारे दिला होता.

Advertisement

राष्ट्रवादीतही फूट

शिवसेनेच्या नंतर जवळपास एक वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वात जवळपास 40 आमदार या पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनीही आमचाच पक्ष खरा राष्ट्रवादी असल्याचे प्रतिपादन केले होते. साहजिकच, या प्रकरणीही निर्णय महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनीच प्रथम द्यावा, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत कालावधी दिला होता.

सुनावणी गतीमान होणार

आता सर्वोच्च न्यायालायने अंतिम कालावधी म्हणून 15 फेब्रुवारी हा दिवस निर्धारित केला आहे. त्यामुळे नार्वेकर यांना 15 दिवसांमध्ये सुनावणी पूर्ण करून निर्णय द्यावा लागणार आहे. परिणामी, आता सुनावणीला अधिक गती प्राप्त होईल, अशी शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष्ाांच्या निर्णयानंतर हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

निर्णयासंबंधी उत्सुकता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकरण शिवसेनेच्या प्रकरणापेक्षा काही प्रमाणात भिन्न आहे. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. त्याच निर्णयाच्या आधारावर नार्वेकर यांनी तोच निष्कर्ष काढला होता. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला नाही. आयोगाकडे सुनावणी होत आहे. त्यामुळे आता नार्वेकर कोणता निर्णय देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.