कृषी खात्यावर मावळत्या संचालकांनाच मुदतवाढ?
दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही : मावळत्या संचालकांना वर्षभराची मुदतवाढ?
पणजी : नियमानुसार कृषी खात्याचे संचालक 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. तथापि सरकारने त्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नसल्यामुळे पुन्हा एकदा मावळत्या संचालकांनाच मुदतवाढ देण्याची शक्यता दिसते. कृषी खात्यामध्ये संचालक आणि त्या मागोमाग येणारे अनुभवी अधिकारी यामध्ये थोडे अंतर असल्यामुळे कृषी उपसंचालिका रैना फर्नांडिस यांची संचालकपदी नियुक्ती होऊ शकते तथापि त्या दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ अन्य अधिकाऱ्यांना संचालकपदी नियुक्ती केल्यास ते देखील त्यानंतरच्या दोन महिन्यात निवृत्त होत आहेत.
परिणामी मावळत्या संचालकांना वर्षभराची मुदतवाढ दिली जाणार की काय? हे समजू शकले नाही. कारण नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली त्या संदर्भातील आदेशही सायंकाळी उशिरापर्यंत जारी केला नव्हता. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ अजिबात देऊ नये, अशी मागणी सातत्याने होत असते. सरकारी कर्मचारी संघटनेचाही त्याचाच आग्रह असतो. तरीही सरकारकडून काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली जाते. ही वेळ सरकारवर का येते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अशाप्रकारची मुदतवाढ निवृत्त होणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना मिळत नाही, सरकार मर्जितील अधिकऱ्यांनाच अशी मुदतवाढ देते असा आरोप होत असतो.