लादेनच्या पुत्राची फ्रान्समधून हकालपट्टी
पित्याचे केले होते कौतुक : फ्रान्सचे दरवाजे कायमस्वरुपी बंद
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा पुत्र उमर बिन लादेनला देशात परतण्यावर कायमस्वरुपी बंदी घातली आहे. फ्रान्सचे गृहमंत्री ब्रूनो रितेयू यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. उमर बिन लादेन आता फ्रान्समध्ये परतण्याची शक्यता कायमस्वरुपी संपुष्टात आल्याचे गृहमंत्री रितेयू यांनी सांगितले आहे.
उमरने सोशल मीडियावर दहशतवादाला बळ देण्याशी निगडित पोस्ट केली होती. 43 वर्षीय उमर हा फ्रान्सच्या नॉरमंडीमध्ये 2016 पासून राहत होता. त्याने ब्रिटिश नागरिक जैना मोहम्मद अल-सबा (जेन फेलिक्स ब्राउन)सोबत विवाह केला होता, ज्यानंतर त्याला फ्रान्समध्ये वास्तव्य करण्याची अनुमती मिळाली होती. तेथे तो पेंटिंग करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होता.
उमरने ओसामा बिन लादेनच्या जन्मदिनी एक पोस्ट केली होती, यात त्याने ओसामा बिन लादेनचे कौतुक केले होते. हा प्रकार दहशतवादाचे समर्थन करणारा मानला गेला. यानंतर उमरचा फ्रान्समध्ये वास्तव्य करण्याचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आला होता. यामुळे उमर हा पत्नीसोबत कतार येथे पोहोचला होता.
ओसामाचा चौथा पुत्र
उमर बिन लादेनचा जन्म 1981 मध्ये सौदी अरेबियात झाला होता. तो ओसामाचा चौथा पुत्र आहे. उमर हा स्वत:च्या पित्यासोबत 1991 ते 1996 पर्यंत सूदानमध्ये राहत होता. त्यादरम्यान त्याला अल-कायदाचा उत्तराधिकारी मानले जात होते. 2011 मध्ये पित्याची साथ सोडल्यावर उमरने अल-कायदाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे मान्य केले होते. लोकांची हत्या करण्याची इच्छा नव्हती, याचमुळे पित्याची साथ सोडल्याचे त्याने सांगितले होते.