व्यक्त होताना...
त्या दिवशी बाजारात अचानक हाक कानावर आली..मॅडम...ओ मॅडम..पाहते तर शामराव एकदम समोर येऊन उभे राहिले..हातात भाजीच्या पिशव्या आणि सोबत दोन शाळकरी मुले.मॅडम...खूप दिवसांनी भेट झाली.
हो..तुम्ही कसे आहात?
अगदी छान. बाजारात आलो होतो. शेजारच्या आजींना भाजी हवी होती. म्हटलं घेऊन जाऊ. हे दोघे माझे सवंगडी. आता घरीच आहे. ही मुलेही येतात रोज..त्यांनाही सोबत घेऊन आलो. छान चाललंय अगदी. शामरावांच्या चेहऱ्यावरचे समाधान बऱ्याच गोष्टी सांगून गेले. मला दोन वर्षांपूर्वी अगदी सकाळीच भेटायला आलेले शामराव आणि त्यांच्याशी झालेला संवाद हे सारं क्षणात नजरेसमोर तरळून गेले.
त्या दिवशी ते अचानकच आले होते. वय ‘बावन्न-पंचावन्न’च्या आसपास..उंच आणि मध्यम बांधा, खांदे थोडे पुढे झुकलेले आणि डोळ्यात काहीशी अपराधीपणाची भावना..ओळखंलं का? महिन्याभरापूर्वी फोन केला होता. शामरावांनी आपला परिचय सांगितला.
मॅडम, बरेच दिवस आपली भेट घ्यायची होती.
थोडी आधी भेट झाली असती तर बऱ्याच गोष्टी टळल्या असत्या. माझं कुटुंब विस्कटण्यापासून वाचलं असतं.
थोडं सविस्तर सांगाल का?
मॅडम..माझा सुरवातीचा कालखंड तसा थोडा विचित्रच. माझी आई फार शिस्तीची होती. अत्यंत कडक शिस्त आणि वडीलही प्रचंड संतापी..सतत घरात दहशतीचं वातावरण. थोडं चुकलं तरी हातात काय असेल त्याने मारच बसायचा. आम्ही तीन भावंडं..दोघे भाऊ आणि बहिण. यामध्ये बहिण आणि मी पार घाबरुन जायचो..एकदा तर माझे वडील एवढे संतापले होते की त्या दिवशी मला जोरात लोटूनच दिलं त्यांनी. हा कपाळावरचा व्रण बघा..तीच जखम ही.
माझा दुसरा भाऊ तसा धाडसी होता. थोडा मोठ्ठा झाल्यावर तो काहीबाही करुन कमाई करायला लागला. कष्ट करत शिक्षण घेतलं, व्यवसाय करु लागला. लग्न केलं. आई वडिलांना स्पष्ट बजावत तो बाजूला झाला. त्याचं सगळं छान चाललंय..बहिणही लग्न होऊन गेली. वडिलांनी मलाही शिक्षण दिलं. नोकरी लागली. पुढे लग्नही झालं. पण अशा घरात सुन नांदायची कशी? तिने काही केलेलं घरात पटायचे नाही. सतत कुरबुरी..दोन वर्षांनी वडील गेले पण..माझंच वागणं विक्षिप्त झालं. सतत अशांत राहु लागलो. कुठेतरी आतल्याआत भावासोबत तुलना करत राहिलो. चिडचिड व्हायला लागली. संतापू लागलो. कधी मुलीवर राग, कधी बायकोवर..शेवटी कंटाळून पत्नीने वेगळे व्हायचा निर्णय घेतला. मुलीला घेऊन ती माहेरी गेली. मुलगी मोठी झाली. चांगली शिकली..तिचे लग्नही झाले. मी एकटाच राहतो.
मॅडम तुमचे अनेक लेख मी वाचले.माझ्या झालेल्या चुका माझ्या लक्षात आल्या. वेगळ्या पद्धतीने विचार केल्यावर लक्षात आलं की, वडील रागीट होते पण काही चांगले गुणही होतेच की त्यांच्यामध्ये. मी ते का नाही घेऊ शकलो? खरंतर क्रोध कसा असतो ते अनुभवलं होतं..मग माझ्या भावनांवर मी का नियंत्रण ठेऊ शकलो नाही. सतत उद्विग्नता, चिडचिड याने कौटुंबीक जीवनाचं किती आणि कसं नुकसान झालंय कळतंय मला. पण आता वेळ निघून गेली आहे. या रागाने माझं फार नुकसान झालं. पण तरीही मी आता बदलायचं ठरवलं आहे. माझा उर्वरीत काळ चांगला घालवायचा आहे. समाजासाठी काही करायचे आहे. परंतु आधी हे बारीकसारीक कारणांवरुन रागावणं, संतापणं मला थांबवायचंय..
शामरावांना नकळत एकदम हुंदका आला..मॅडम मला थोडी मदत हवी आहे तुमची. हे काय आणि कसं करु हे समजत नाही. त्यानंतर बराच वेळ यावरती चर्चा झाली. नंतर शामराव काही काळ समुपदेशनासाठी नियमीतपणे येत राहिले. त्यांनी विविध तंत्र अवगत करत प्रयत्नपूर्वक बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण आणले. अचानक त्या दिवशी अशी भेट झाली आणि त्यांच्यात झालेला बदल अनुभवायलाही मिळाला.
शामरावांसारख्या संतापाने ग्रासलेल्या अनेक व्यक्ती, भावनांचे विविध कंगोरे हे सतत वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतच असतात. कधी त्यांच्यासारखी व्यक्ती आपली समस्या मांडते तर कधी एखादी स्त्राr तिची व्यथा मांडते, काय सांगू मॅडम..आमचे हे जमदग्नीचा अवतारच. मी आणि मुले भितीच्या छायेखालीच वावरतो. कशाने चिडतील काही भरवसा नाही. अहो रस्त्यावर ट्रॅफीकने हैराण केलं तरी राग आमच्यावर..काहीही कारण पुरतं..पण शांत असतील तेव्हा यांच्यासारखा माणूस नाही. काय करावं तेच कळत नाही.
अनेकदा आयुष्य घडविण्याचं वा बिघडवण्याचे काम भावनांमार्फतच होत असतं. राग किंवा क्रोधाचा यात पहिला नंबर लागेल असं म्हटल्यास वावगं ठरु नये. अगदी क्षुल्लक कारणांवरुन रागावणारी आणि वर्षानुवर्षे अबोला धरणारी माणसं पावलोपावली भेटतात. सख्ख्या भावंडांमध्येही वितुष्ट येतं, पती-पत्नी, पालक-पाल्य, मैत्री अशा अनेक नात्यांमध्ये राग आणि त्यातून विस्कटणारे नातेसंबंध अशी असंख्य उदाहरणे समोर येतात. यातून नातेसंबंधावर तर परिणाम होतोच परंतु क्रोधाचे होणारे अनेक शारिरिक आणि मानसिक परिणामही सर्वज्ञात आहेत. अर्थात केवळ क्रोधच नव्हे तर कोणत्याही विघातक भावनेची तीव्रता वाढत गेली की वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागतात.
खरंतर विचार करण्याची पद्धत, निर्माण होणाऱ्या भावना याकडे आपले लक्ष असणे फार गरजेचे आहे.
रागाच्या बाबतीत बोलायचे तर अनेकदा आपल्याला अपेक्षीत आहे तसे घडले नाही की राग येतो.
राग उत्पन्न करणारी काही उदाहरणे पाहुया
1.आपण रांगेत उभे आहोत..अचानक आपल्यामागून कुणीतरी भरभक्कम माणूस येतो आणि आपल्यापुढे घुसतो.
2.वर्गात अनेक मुले बोलत आहेत परंतु ‘अमेय गप्प बस’ म्हणून शिक्षक फक्त अमेयलाच ओरडतात.
3.काहीवेळा ग्रुपमध्ये बऱ्याच जणांचे एकमत होते आणि आपण बाजूला पडतो.
4.रस्त्याने जातोय आणि ट्रॅफिक जाम झाले.
5.घरात भांवडं आहे आई दटावते, ‘ही वस्तु तुझी एकट्याचीच नाही..त्यालाही दे.’
पहा हं..या सर्व उदाहरणामध्ये एक समान सूत्र आहे की उदाहरणातील व्यक्तीला टीका, वरचढपणा, नकार, कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना, आपलं आहे ते हिरावून घेतले जाणे किंवा विरोध हे सर्व अप्रिय आहे. तुमची सुरक्षा, सन्मान, इच्छा, अपेक्षा यांना हानी पोहचली किंवा अशा पद्धतीच्या नावडत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं की पटकन राग येतो. मलाच नेहमी ओरडा खावा लागतो..माझ्या बाबतीत असंच होतं, माझं मत त्यांनी विचारात घेतलेच नाही, अशी समजूत करु घेतली की रागाचा पारा अजूनच वाढतो. पटकन् राग येणाऱ्या व्यक्तीला संतापासाठी किरकोळ कारणही पुरतं. तुम्ही म्हणाल की आपली चूक नसली समोरच्याची असली तरी रागवायचं नाही का? अन्यायाविरुद्ध राग ही स्वाभाविक प्रतिक्रीया आहे. अगदी खरं. परंतु तरीही राग राग करत वादावादी करुन ‘अॅग्रेसीव्ह’ अर्थात आक्रमक होण्यापेक्षा आपल्याला ‘अॅसरटीव्ह’ ‘आग्रही’ होऊन आपला मुद्दा मांडण्याचे कौशल्य शिकता आले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हे मात्र निश्चित!!
अॅड. सुमेधा संजिव देसाई