For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यक्त मृत्यो आप्त सखा......

06:16 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्यक्त  मृत्यो आप्त सखा
Advertisement

मृत्यूते जन बाहतात परि त्या भोगास वैतागुनि

Advertisement

मृत्यूते म्हणती सबूर परि ते सारे परंतु मनी

आयुष्यात सुखापेक्षा दु:खंच कितीतरी जास्ती असतात. एखादा सुखाचा स्टॉप लागलाच तर पुढचे दहा स्टॉप दु:खाचे हे ठरलेलं असतं. कधी कधी या सगळ्या गोष्टी माणसाला अतिशय असह्य होऊन जातात. कारण सहनशक्तीची एक लिमिट असते. ती जेव्हा ओलांडली जाते तेव्हा त्या परिस्थितीत सुटायला मार्ग उरत नाही. आणि सर्व परिस्थिती आजपेक्षा उद्या, उद्यापेक्षा परवा, परवापेक्षा हेरवा आणखी वाईट अशा पातळीला जायला लागतात. यातून सुटावं कसं हेच माणसाला कळेनासं होतं. आणि यातून सुटकेचा एकच मार्ग उरतो तो म्हणजे मृत्यू अशी मग त्या माणसाची समजूत होते. आत्महत्या हा प्रकार याच भयानक गोष्टीचा त्याहून भयानक शेवट असतो. परंतु आत्महत्या हा समस्येवरती उपाय असूच शकत नाही. आत्महत्या म्हणजे रोगापेक्षा उपचार भयानक अशी गोष्ट आहे. कारण ती केल्यानंतर पाठी राहिलेले लोक जे असतात त्यांच्यासाठी जिवंतपणीच मरणाच्या यातना ओढवतात. माणसाला नक्की मृत्यू विषयी एवढं आकर्षण का वाटतं, किंवा मृत्यू म्हणजे सुटका असं त्याला का वाटत असावं? बहुदा यामुळे असेल की पारलौकिक आयुष्य काय असतं हेच माणसाला माहीत नसतं. तिथे काही अडचणी असू शकतील. आणि तिथल्या अडचणींवर मात करण्यासाठी तिथं मृत्यूची सोय उपलब्ध नसेल. याचाही विचार कोणी करीत नाही. मला वाटतं की स्वत:ला नास्तिक म्हणवणारा प्रत्येक जण आपल्या शेवटच्या क्षणी हाच विचार करीत असणार. त्यावेळी त्याला त्याच्या मनातले विचार कोणाला कळण्याचा धोकाही नसतो. आणि असले काहीतरी विचार केल्याशिवाय त्याला त्यावेळेला पर्यायही राहत नसावा.

Advertisement

लग जा गले के फिर यह हसीं रात हो ना हो

 शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो

मनोज कुमार आणि साधना या जोडीचं प्रचंड म्हणजे प्रचंड हृदयस्पर्शी गाणं आहे हे! लतादीदींच्या (खरं तर सगळी गाणी त्यांची जबरदस्तच आहेत ही वस्तुस्थिती!)अतिशयच लोकप्रिय झालेल्या गाण्यांपैकी हे एक गाणं! इतक्या आर्ततेने गायलंय की आयुष्याची सारी किंमत आणि मृत्यूची माणसाच्या आयुष्यातली जागा या दोन्ही गोष्टी ते गाणं जसं जसं पुढे जाईल तसं तसं ऐकणाऱ्याला कळत जातात. ती म्हणते, की खरोखरच नशिबानेच हे काही क्षण, खरंतर सुवर्णक्षण वाट्याला आले आहेत. त्या क्षणांमध्ये एकमेकाला भरभरून भेटूया. कुणास ठाऊक ही वेळ निघून गेल्यावर या जन्मात आपल्याला परत भेटता येईल की नाही? आत्ताच एकमेकांना जवळून पाहून घेऊया. एकमेकांसोबत काळ व्यतीत करूया. ही रात्र फिरून येईलच असं नाही. आपण उद्या उठून दोघे कुठे असू हे सांगता येईलच असं नाही. इतकी वेदना देतं ते गाणं! खरोखर ज्याला स्वत: सोबत काही वेडंवाकडं करून घेण्याची इच्छा झालेली असेल त्यांनी हे गाणं जरूर ऐकावं. हे गाणं मृत्यूची किंमत आणि जीवनाचे मूल्य यांची एकाच वेळेस तुम्हाला माहिती करून देईल. आयुष्यात एकमेकांना परत भेटूच नाही शकणाऱ्या जोडीचं हे मनोगत आहे असं वाटतं. याच्यामध्ये प्रेयसी आता हयातच नाही असं वाटत राहतं. आणि हयात नसलेल्या व्यक्तीने आर्ततेने केलेली विनवणी जेव्हा तिची मिती भेदून आपल्या मितीपर्यंत पोहोचते, तेव्हा ऐकणाऱ्याच्या काळजावर अक्षरश: चरे पडतात. कारण त्याला माहिती असतं की तिच्याकडे शरीरच नाहीये. आपण कितीही आटापिटा केला तरी ती काही आपल्या कवेत येऊच शकणार नाहीये. ही तडफड, ही तगमग कुठल्या म्हणून शब्दात उतरवावी? कोण जाणे.

झाडावर फळं धरतात. फळं पिकून खाली गळून पडतात. मातीत मिळतात. पण त्यातल्या बिया शिल्लक राहतात. त्या बिया जमिनीत जाऊन एकरूप होतात आणि रुजून वर येतात. एका फळातून अशा अनेक बिया बाहेर पडतात. प्रत्येक बी पासून एक एक झाड निर्माण होतं. एक फळ अनेक झाडांना जन्माला घालतं. म्हणजे संपलेल्या अस्तित्वासोबतच नवीन रुजवण ही त्या परिस्थितीची दुसरी बाजू असते. प्राणी असो किंवा मानवाचा वंश असो वंशसातत्य हे चालूच राहत असतं. सक्षम, सुसंस्कृत अशी पुढची पिढी जन्माला घालणे आणि स्वत: मातीत मिळून जाणे हाच निसर्ग आहे. म्हणून तर नातवाचा चेहरा बघितल्यानंतर आजोबांचा चेहरा आपोआप आठवतो. काय म्हणावं या मृत्यूला? ओंजळीत धरून धरून वंशसातत्या नावाची गोष्ट तो पुढे नेतो म्हणून त्याला सखा म्हणावा? की आपला चिमूटभर जीव जो असतो तो त्याच्या सोबत घेऊन जाणार असतो म्हणून शत्रू म्हणावा? हा प्रश्नच पडतो आपल्याला

फूल गळे फळ गोड जाहले

बीज नुरे डौलात तरु डुले

तेल जळे बघ ज्योत पाजळे

कां मरणि अमरता ही न खरी?

रे खिन्न मना बघ जरा तरी

घन तमी शुक्र बघ राज्य करी

पुन्हा एकदा लतादीदी आपल्याला भा. रा. तांब्यांच्या मनातलं गूज सांगतात. याचं संगीतही हृदयनाथांच्या स्टाईलचं म्हणजेच मोठं गूढ आहे. यातला लयीचा वावर सुद्धा अद्भुत म्हणावा असाच आहे. आयुष्याचा कंटाळा का बरं यावा? आणि माणसाने कधीतरी मरायचंच आहे या गोष्टीने खिन्न का व्हावं? किंवा भोवतालचे छोटे छोटे आनंदकण पोटी साठवून बसलेली परिस्थिती हाका मारून आपल्याला बोलवत असताना तमाच्या तळाशी का म्हणून जाऊन बसावं? हा प्रश्न राजकवी भा.रा. तांबे यांना पडलेला असावा. आजच्या भाषेत म्हणायचं तर हे एक प्रकारचं कौन्सिलिंगच आहे. मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे. परंतु प्रत्येक मृत्यूमध्ये काहीतरी नवीन असतं हे इतक्या सुंदर शब्दात त्यांनी समजावलंय की खरोखर कमाल आहे. ‘मरणात खरोखर जग जगते’ ही ओळ खरंच अर्थपूर्ण आहे ती त्यासाठी.

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो

स्वसत्वदाने पाश छेदितो

ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो

रे स्वभाव हा! उलटे भलते

भा. रा. तांब्यांच्याच याही ओळी! अतिशय तेजस्वी तारका आकाशातून झगझगत खाली येताना आपण पाहतो. आपल्याला वाटतं किती तेजोमय हे रूप आहे किती सुंदर आहे वस्तुत: तिचा तेव्हा मृत्यू होत असतो. पण हा मृत्यू किती सुंदर असतो! अशाच एका मृत्यूने आपल्या महाराष्ट्रात एक अत्यंत सुरेख सरोवर जन्माला घातलेलं आहे. त्याचं नाव लोणार सरोवर. तारकेचा मृत्यू किती म्हणून देखणा असावा!

आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां ।

तो जाला सोहळा अनुपम्य

नारायणें दिला वस्तीस ठाव ।

ठेवूनियां भाव ठेलों पायीं ।।4।।

असं तुकाराम महाराज म्हणतात ते काय उगीच मृत्यूचा अर्थ संतांना कळला होता. म्हणूनच ते मृत्यूचासुद्धा सोहळा करतात. ‘आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा’ असं म्हणतात. किंवा ‘जाऊ देवाचिया गावा घेऊ तेथेची विसावा’ म्हणून आनंदाने आपल्या थोरल्या माहेरी जायला निघतात. मृत्यूचा यापरता सुंदर अर्थ कोणता असेल?

- अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.