केपीटीसीएल रोडवरील खुले पथदीप धोकादायक
खांबांवरील झाकणी खराब झाल्याने तारा, स्वीच उघड्यावर
बेळगाव : स्मार्ट सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या केपीटीसीएल भवन रोडवर पथदीपांच्या खांबांवर खुले विद्युत पॅनेल दिसून येत आहेत. विद्युत खांबांवरील झाकणी खराब झाली असून विद्युत तारा, स्वीच खुल्यावर आहेत. यामुळे धोका वाढला असून लहान मुले अथवा पादचाऱ्यांचा चुकून हात लागल्यास विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठा गाजावाजा करत सात ते आठ वर्षांपूर्वी केपीटीसीएल रोड हा स्मार्ट सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट राबविण्यात आला. परंतु या ड्रीम प्रोजेक्टमध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे काही दिवसांनी दिसून आले. प्रशस्त रोड असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकर्सची संख्या अधिक असते. परंतु या रस्त्यावरून फिरणे आता नागरिकांसाठी धोक्याचे ठरू लागले आहे. चुकून एखाद्या नागरिकाचा विद्युत खांबातील वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार असून, धोका वाढणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी तसेच हेस्कॉमने खबरदारी घेऊन केपीटीसीएल रोडवरील सर्व डेकोरेटिव्ह पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.