स्मार्टफोन्सची निर्यात ठरली अव्वल, हिऱ्याची घसरली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातून स्मार्टफोनच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जूनअखेरच्या तिमाहीत हिऱ्याच्या निर्यातीला मागे टाकण्यात यश मिळालं आहे.
वाणिज्य विभागाकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या जून तिमाहीत स्मार्टफोन्सची निर्यात 2 अब्ज डॉलर्सची झाली आहे. हिऱ्याच्या निर्यातीत हे प्रमाणात अधिक दिसून आले आहे. हिऱ्याची निर्यात 1.44 अब्ज डॉलर्सची जूनच्या तिमाहीत नोंदली गेली आहे. स्मार्टफोन्सच्या एकुण निर्यातीत आयफोनचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. डिसेंबर 2024 च्या तिमाहीत स्मार्टफोन्सची निर्यात ही सर्वाधिक 1.42 अब्ज डॉलर्सची झाली होती. त्या तिमाहीत हिऱ्याची निर्यात 1.3 अब्ज डॉलर्सची राहिली होती.
पीएलआय योजना फलदायी
अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तुंमध्ये स्मार्टफोन्सचा दबदबा अधिक राहिला आहे. सरकार देशात पीएलआय योजना राबवत असून याचा फायदा अॅपलला उठवता आला आहे. आयफोन निर्यातीचे प्रमाण वाढलेले आहे. पीएलआयची घोषणा झाल्यानंतर आर्थिक वर्ष 2020 मध्ये अॅपलकडून आयफोन निर्मिती भारतात सुरु झाली. त्यावेळी 1.6 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन्सची निर्यात झाली होती.
तर या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये स्मार्टफोन्सची निर्यात 11.1 अब्ज डॉलर्सची झाली होती ज्यात अॅपल निर्मित आयफोन्सचा वाटा 5 अब्ज डॉलर्सचा होता. यातही 2.15 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन्स हे अमेरिकेला निर्यात करण्यात आले आहेत. 2024 पर्यंत आयफोन निर्यात 10 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली असून स्मार्टफोन्सच्या एकुण निर्यातीत आयफोनची हिस्सेदारी 66 टक्के आहे.
2022, 2023 मधील देशातून निर्यात
याचदरम्यान भारतातून अमेरिकेला स्मार्टफोन्सची निर्यात 158 टक्के इतकी वाढून ती 5.56 अब्ज डॉलर्सची झाली आहे. वर्ष 2024 मध्ये निर्यातीत पाहता हिऱ्यानंतर स्मार्टफोनचा नंबर दुसरा लागतो. यात आयफोन्सचा वाटा अधिक आहे. तर अमेरिकेने 2022 आणि 2023 मध्ये अनुक्रमे 66 अब्ज डॉलर्स, 59 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन्स, 55 अब्ज डॉलर्स व 46 अब्ज डॉलर्सचे लॅपटॉप, टॅब्लेट आयात केले होते.