आभियांत्रिकी वस्तुंची निर्यात 7 टक्क्यांनी वाढली
नवी दिल्ली :
ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि हवाई उत्पादनाच्या क्षेत्राने मजबूत कामगिरी केली असून याचाच फायदा अभियांत्रिकी वस्तुंच्या निर्यातीमध्ये वाढीत दिसून आला. मे महिन्यामध्ये अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात 7.39 टक्के वाढली होती. वर्षाच्या आधारे पाहता ही वाढ दिसून आली असून भारताने मे मध्ये 9.99 अब्ज डॉलर्सच्या आभियांत्रिकी वस्तुंची निर्यात करण्यामध्ये यश मिळविले आहे. ईईपीसी इंडिया या संघटनेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
सदरच्या वस्तुंची निर्यात ही अमेरिका, टर्की, सऊदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, त्याचप्रमाणे उत्तर आफ्रिका, लॅटिन अमेरिका अशा युरोपियन देशांमध्येसुद्धा करण्यात आली आहे. जागतिक भूराजकीय अस्थिर परिस्थितीतदेखील अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात वाढीव राहणे ही चांगली बाब असल्याचे मत ईईपीसी इंडियाचे चेअरमन अरुणकुमार गरोडिया यांनी मांडले आहे. आगामी काळातही निर्यातीमध्ये सरकारच्या प्रोत्साहनात्मक धोरणामुळे वाढ करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोह खनिज आणि त्यासंबंधीत वस्तुंची निर्यात मात्र सदरच्या महिन्यात 21 टक्क्यांनी घसरणीत दिसून आली.