कृषी खात्यामार्फत निर्यात जागृती कार्यक्रम
बेळगाव : फेडरेशन ऑफ एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन,कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक दिवसीय निर्यात जागृती कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी बी. एच. हरीष होते. व्यासपीठावर कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, चिकोडी विभागाचे कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर, जिल्हा औद्योगिक केंद्राचे सत्यनारायण भट आदी उपस्थित होते. यावेळी हळद निर्यातीची क्षमता, गूळ उत्पादन प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. त्याबरोबर गूळ आणि हळद निर्यातीबाबतची भूमिका, कृषी खात्याने निर्यातीसाठी केलेला वित्तपुरवठा, कर्नाटक औद्योगिक धोरण या मुद्यावरही चर्चा झाली. बेळगाव जिल्ह्यात उसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. मात्र गूळ निर्यात म्हणावी तशी होत नाही. यासाठी गूळ निर्यातीवर लक्ष केंद्रीत करण्याबाबतच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. या प्रसंगी शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी, गूळ उत्पादक आदी उपस्थित होते.