दिल्लीत दोन स्थानी स्फोट
घटनास्थळी सापडली पांढरी पावडर : प्रयोगशाळेत तपासणी होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहरात दोन स्थानी स्फोट झाला आहे. मात्र या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) या स्फोटांची चौकशी हाती घेतली आहे. बुधवारी सकाळी पावणेबाराच्या आसपास प्रशांत विहार भागात पहिला स्फोट झाला. त्यानंतर पोलिसांनी स्फोट झालेल्या जागेची नाकेबंदी केली आहे. स्फोट झालेल्या स्थानी पांढरी पावडर आढळली असून ती परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. स्फोटाचे वृत्त कळताच त्वरित पोलिसांनी तपासास प्रारंभ केला आहे.
एनआयएलाही या स्फोटांची माहिती देण्यात आली असून एनआयचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहचले. दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्रारंभिक तपासानंतर आता एनआयएने सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. या स्फोटांमागे घातपात आहे का, याचा तपास हे प्राधिकरण करणार आहे. गेल्या एक महिन्यात दिल्लीत अशा स्फोटांच्या चार घटना घडल्या असून हा मोठ्या कारस्थानाचा भाग असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तपासातून काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे. प्रत्येक स्फोटाच्या ठिकाणी पांढरी पावडर आढळून आली आहे.
20 ऑक्टोबरलाही घटना
20 ऑक्टोबरलाही प्रशांत विहार आणि रोहिणी या भागांमध्ये स्फोटाच्या घटना घडल्या होत्या. तथापि, या घटनांचा तपास पूर्ण होण्याआधीच या नव्या घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. हे स्फोट घडविण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला गेला आहे, तो पाहता हे दहशवाद्यांनी घडविलेले स्फोट आहेत, हे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे सखोल तपासाची आवश्यकता असून एनआयएकडे चौकशी सुपूर्द केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे. रोहिणी भागात असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशालेजवळही एक स्फोट झाला होता.