चंदीगडमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर स्फोट
दूरपर्यंत आवाज : शहरात अलर्ट जारी : स्कूटीमध्ये आढळले स्फोटक पदार्थ
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये बुधवारी सायंकाळी धमाका झाल्याने खळबळ उडाली. शहरातील सेक्टर 37 मधील भाजप मुख्यालयाबाहेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून तपास सुरू केला आहे. जवळपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही तपासणीमध्ये अज्ञाताने स्फोटके फेकल्याचे दृश्य निदर्शनास आले आहे. दुसरीकडे, खलिस्तानी दहशतवादी संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्विकारल्याचेही समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 37 मधील पंजाब भाजप मुख्यालयाबाहेर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका स्कूटरच्या बाजूला स्फोट झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंदीगडचे एसएसपी आणि आयजी पुष्पेंद्र कुमार तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. स्कूटर कोणाची होती, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या स्फोटामुळे भाजप कार्यालयाच्या आत कोणतेही नुकसान झालेले नाही. अग्निशमन दल, श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमला पाचारण करून नमुने गोळा केले जात आहेत.
क्रूड बॉम्बसारखी वस्तू असल्याचे निष्पन्न : पोलीस
पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत संपूर्ण परिसर सील करून तपास हाती घेतला आहे. प्राथमिक तपासणीअंती क्रूडबॉम्बसदृश वस्तूचा स्फोट झाल्याचे चंदीगडच्या एसएसपी कंवरदीप कौर यांनी सांगितले. तथापि, ती वस्तू तिथे ठेवण्यात आली होती की फेकण्यात आली होती हे अद्याप सांगता येत नाही. स्फोटामुळे संरक्षक भिंत आणि आजुबाजुच्या वाहनांवर काही खुणा प्रत्यक्षपणे निदर्शनास आलेल्या आहेत.
पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्फोट होणे चिंताजनक : भाजप
या घटनेबद्दल भाजप नेते विनीत जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कार्यालयाबाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्पष्ट केले. या स्फोटात एक स्कूटर आणि एका कारचे नुकसान झाले. पोलीस तपास करत असून कार्यालयाबाहेर कोणीतरी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे दिसून येत आहे. बॉम्बस्फोटानंतर परिसरात धूर पसरला होता. सर्वत्र घबराटीचे वातावरण होते. आम्ही ही चिंतेची बाब मानतो. पक्षाच्या कार्यालयाबाहेर असा स्फोट होणे चिंताजनक असल्याचेही विनीत जोशी यांनी सांगितले.