सिव्हिल हॉस्पिटल आवारात स्फोट
चौकशीअंती मॉक ड्रिलद्वारे आणीबाणीचा सराव असल्याचे स्पष्ट
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव शनिवारी दुपारची वेळ, सिव्हिल हॉस्पिटल आवारात कानठळ्या बसवणारा स्फोटाचा आवाज आला. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खिडकीतून धूर येऊ लागला. काहीतरी घडले या संशयाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली. त्याचवेळेला त्यांच्या मदतीला अग्निशमन दल, एसडीआरएफ व होमगार्ड धावले.
सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काहीतरी दुर्घटना घडली आहे का? असा संशय यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, या परिसरात कोणतीही दुर्घटना घडली नव्हती. अग्निशमन दल, एसडीआरएफ व होमगार्ड, रेडक्रॉस व सिव्हिल डिफेन्सच्या सहभागातून झालेली ती मॉक ड्रिल होती.
आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांचे संरक्षण कसे करायचे? त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कशा पद्धतीने हलवायचे? आदींविषयी प्रात्यक्षिकांसह शनिवारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी रंगनाथ राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये तीन रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, बिम्सचे डॉक्टर व इतर कर्मचारीही सहभागी झाले होते.
प्रत्यक्षात कसली घटना घडली नाही, हे मॉक ड्रिल आहे असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करताच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. मॉक ड्रिलसाठी फटाक्यांचा वापर करण्यात आला. इस्पितळातील एका विभागातून प्रत्यक्ष धूर आला. यासाठीही रसायनांचा वापर करण्यात आला. नागरिकांना माहिती मिळावी, यंत्रणा सदैव सज्ज असावी यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते, असे रंगनाथ राठोड यांनी सांगितले.