रोहा एमआयडीसीत स्फोट...दोघांचा जागीच मृत्यू! अन्य चार कामगार गंभीर जखमी
साधना कंपनीतील घटना
खेड / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम रासायनिक कंपनीत गुरुवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटात दिनेश कुमार आणि संजीत कुमार (दोघे रा. उत्तरप्रदेश) या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार कामगार गंभीररित्या जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उत्पादन धुण्यासाठी वापरातील मेथॉनॉल टँकचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटात कंपनीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नीलेश भगत (रोहा), बस्की यादव, अनिल मिश्रा, सतेंद्र कुमार अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत. जखमींना तातडीने रोहा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. तर एका कामगारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कंपनीचे प्रशासक विद्याधर बेडेकर यांनी सांगितले. स्फोट झाल्याचे वृत्त कळताच रोहा पोलीस, अग्निशमक दलाचे जवान, अन्य मदतकर्ते तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले.
स्फोटाने नजीकची गावे हादरली
साधना नायट्रोकेम रासायनिक कंपनीतील बी-2 रासायनिक प्लांटमध्ये उत्पादन धुण्यासाठी असलेल्या मेथनॉल केमिकल टँकचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही कामगारांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले होते. अथक प्रयत्नाने ढिगारा उपसल्यानंतर दोघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. तर अन्य चार कामगार गंभीर अवस्थेत आढळले. हा स्फोट इतका भीषण होता की, 1 कि.मी. अंतरापर्यंत गेलेल्या आवाजाने साऱ्यांच्याच कानठळ्या बसल्या. स्फोटाने एमआयडीसीसह नजीकची गावेही हादरली. काही ग्रामस्थांच्या घरांच्या खिडक्यांची मोडतोड झाली. आजुबाजूच्या कंपन्यांसह वस्तीतील घरांनादेखील हादरे बसले. स्फोटानंतर कंपनीच्या आवाराबाहेर बघ्यांची एकच गर्दी उसळली. स्फोटाचा रोहा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
गतवर्षीच्या स्फोटाच्या जाग्या झाल्या आठवणी
गतवर्षी रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 7 कामगारांना प्राणास मुकावे लागले होते. गुरुवारी साधना नायट्रो कंपनीत घडलेल्या स्फोटाने गतवर्षी झालेल्या स्फोटाच्या आठवणी जाग्या झाल्या. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्फोटाच्या घडणाऱ्या घटनांनी कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.