पुतीन यांच्या ताफ्यातील लिमोझिन कारमध्ये स्फोट
गुप्तचर संस्था एफएसबीच्या मुख्यालयाजवळ घटना
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये रविवारी मॉस्कोमध्ये स्फोट झाला. हा स्फोट गुप्तचर संस्था एफएसबीच्या मुख्यालयाबाहेर झाला. ही एक आलिशान लिमोझिन कार होती. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीच्या इंजिनमध्ये आग लागल्यानंतर ती आत पसरली. तथापि, ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा ही कार पुतीन यांच्या ताफ्याचा भाग नव्हती. तसेच पुतीनही या कारजवळ नव्हते. हा हत्येचा कट होता की अपघात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ताफ्यातील कारमध्ये स्फोट झाल्यानंतर पुतीन यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. 26 मार्च रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुतीन यांचा लवकरच मृत्यू होईल, असा दावा केला होता. त्यामुळे या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतीन अनेकदा लिमोझिन कार वापरतात. गेल्यावर्षी त्यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना एक आलिशान लिमोझिन कार भेट म्हणून दिली होती. ती रशियामध्ये बनवली जाते. रस्तामार्गावर पुतीन एका सशस्त्र ताफ्यासह प्रवास करतात. यामध्ये एके-47, अँटी-टँक ग्रेनेड लाँचर्स आणि पोर्टेबल अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. जेव्हा पुतीन गर्दीत असतात तेव्हा त्यांना चार सुरक्षा घेऱ्यांनी वेढलेले असते. परंतु त्यांचे अंगरक्षक फक्त एकाच भागात दिसतात.