For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीरियात फ्रेंच अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यान स्फोट

06:18 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीरियात फ्रेंच अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यान स्फोट
Advertisement

अध्यक्षांच्या हॉटेलपासून 125 मीटर अंतरावर 2 स्फोट : दौरा जारी राहणार असल्याचे मॅक्रॉन यांचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था/ दमास्कस

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्यादरम्यान मंगळवारी दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. मॅक्रॉन हे तेथील फोर सीझन्स हॉटेल्समध्ये वास्तव्य करत असून तेथून केवण् 125 मीटर अंतरावर हे स्फोट झाले आहेत. मॅक्रॉन हे सोमवारी दमास्कसमध्ये पोहोचले होते. या स्फोटांमध्ये 18 जण जखमी झाले असून यात 4 पोलिसांचा समावेश आहे. सोशल मीडियावर या स्फोटांचा व्हिडिओ समोर आला आहे. तर स्फोटानंतर सुरक्षा दलांनी पूर्ण भागाला घेरले आणि रस्ते बंद केले.

Advertisement

मॅक्रॉन हे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे फ्रेंच अध्यक्षीय कार्यालय एलिसी पॅलेसकडून सांगण्यात आले. सीरियाचे लोक एक पूर्णपणे स्वतंत्र, सुरक्षित, एकजूट आणि सर्व समुदायांना सोबत घेऊन वाटचाल करणारा देश इच्छितात. त्यांच्या या स्वप्नाला कोणीच रोखू शकत नाही, माझा दौरा जारी राहणार असे या घटनेनंतर मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.

सत्तापालटानंतर पहिलाच दौरा

बशर अल-असद यांना सत्ता गमवावी लागल्यावर सीरियाचा दौरा करणारे मॅक्रॉन हे पहिले मोठे युरोपीय नेते ठरले आहेत. दमास्कस विमानतळावर सीरियाचे विदेशमंत्ती असद अल-शैबानी यांनी त्यांचे स्वागत केले होते. तर मॅक्रॉन यांनी मंगळवारी सीरियाचे अध्यक्ष अहमद अल-शरा यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक उमय्यद मस्जिदचा दौरा केला आहे. मॅक्रॉन यांच्या दौऱ्यात सीरियाची पुनर्बांधणी, विदेशी गुंतवणूक, सुरक्षा सहकार्य आणि दहशतवादविरोधी अभियान प्रमुख अजेंडा आहे. दोन्ही देशांदरम्यान पायाभूत सुविधा, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रात अनेक करारांवरही चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वीही स्फोट

3 जुलै रोजी दमास्कसच्या पॅलेस ऑफ जस्टिसनजीक एका कॅफेत बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले होते. कॅफेत आयईडी ठेवण्यात आला होता, याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. काही घटक देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य दमास्कसचे गव्हर्नर माहेर मरवान इदलिबी यांनी केले होते.

Advertisement
Tags :

.