इन्व्हर्टरच्या शॉर्टसर्किटमुळे स्फोट
घराला लागली आग : 55 वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू, दोघे जखमी
त. भा. प्रतिनिधी
जुने गोवे, पणजी : मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. सपना बाबलो वळवईकर (55) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिला आणि त्यांची दोन मुले समृद्धी वळवईकर (24) व साइतेज वळवईकर (17) गाढ झोपेत होते. अचानक घरातील इन्व्हर्टरचा शॉर्टसर्किटमुळे मोठा स्फोट झाला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण घरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने आणि झोपेत असल्यामुळे कुणालाच बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. यानंतर धूर फुफ्फुसात गेल्याने दोन्ही मुले घटनास्थळीच बेशुद्ध पडली. घराला लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांसह अग्निशामक दलाला पाचारण केले. याकामी रूपेश फोंडेकर, उमाकांत नावेलकर, शाम, हृदयनाथ वळवईकर या तसेच अन्य शेजाऱ्यांनी सहकार्य केले.
डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत सपना वळवईकर यांचा मृत्यू झाला होता. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दोन्ही गंभीर जखमी मुलांना तातडीने उपचारासाठी गोमेकॉ ऊग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
वीज खात्याचे सहाय्यक अभियंता संजय नाईक, कनिष्ठ अभियंता दिगेश वाळके, चोडणचे सरपंच पांडुरंग वायंगणकर, पंचायतसदस्य रमाकांत प्रियोळकर, संजय कळंगुटकर, तलाठी हेमंत नाईक तसेच वळवईकर यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आग लागण्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला. खोलीतील किंमती फर्निचर, दूरदर्शन संच, सिलिंग पंखे व इतर किंमती वस्तू आगीत खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे लक्षात येते. ओल्ड गोवा पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक लॉरेन्स सिक्वेरा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.