For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅस सिलिंडर गळतीमुळे स्फोट

11:06 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
गॅस सिलिंडर गळतीमुळे स्फोट
Advertisement

एकाच कुटुंबातील 7 जण जखमी : तिघांची प्रकृती चिंताजनक, गोकाकमधील अक्कतंगेरहाळ येथील दुर्दैवी घटना

Advertisement

बेळगाव : गॅस सिलिंडरमधील गळतीमुळे स्फोट होऊन एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ येथे ही घटना घडली असून जखमीत 9 महिन्यांचे बाळ व बाळंतिणीचाही समावेश आहे. स्फोटामुळे घराची कौलेही उडून गेली आहेत. सर्व जखमींना गोकाक येथील स्थानिक इस्पितळात उपचार केल्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून बेळगावला हलविण्यात आले आहे. मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. राजश्री अशोक निर्वाणी (वय 42), दीपा सोमनगौडा निर्वाणी (वय 42), विद्या अशोक निर्वाणी (वय 13), बसनगौडा सोमनगौडा निर्वाणी (वय 9 महिने), सोमनगौडा बसनगौडा निर्वाणी (वय 44), नवीन अशोक निर्वाणी (वय 14), अशोक बसनगौडा निर्वाणी (वय 45) अशी जखमींची नावे आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद व गोकाकचे पोलीस उपअधीक्षक दादापीर मुल्ला यांनी खासगी इस्पितळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. उपलब्ध माहितीनुसार नेहमीप्रमाणे शनिवारी रात्रीचे जेवण आटोपून कुटुंबातील सर्वजण झोपी गेले होते. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा गळतीचा वास आला. मोबाईल बॅटरी ऑन करून कुटुंबातील एक जण रेग्युलेटर बंद करण्यासाठी उठला. त्यावेळी रेग्युलेटरजवळ पोहोचताच स्फोट होऊन घरातील वस्तू, घरावरील कौले उडून पडली. रात्रीचे जेवण आटोपून झोपी गेलेले कुटुंबीयही या घटनेत भाजून जखमी झाले असून स्फोटानंतर घराला आग लागली. स्फोटाच्या आवाजाने शेजाऱ्यांना जाग आली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 108 रुग्णवाहिकेतून जखमींना बेळगावला पाठविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.