अमेरिकेत तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट
वृत्तसंस्था/ मेक्सिको
अमेरिकेत न्यू मेक्सिकोमधील आर्टेसिया येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर, रिफायनरीमधून दाट, काळा धूर निघाला आणि तो शहराच्या बहुतेक भागात पसरला. सुदैवाने, काही तासांत आग आटोक्यात आली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी याप्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर रिफायनरी आर्टेसिया नदीच्या मुख्य जंक्शनजवळ असून ती न्यू मेक्सिकोमधील सर्वात मोठी रिफायनरी मानली जाते. रिफायनरी चालवणारी कंपनी एचएफ सिंक्लेअर यांनी आग विझवण्यात आल्याची माहिती जारी केली. तसेच रिफायनरी आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली असून सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका आढळलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी रवाना करून आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले.