गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 17 ठार
बनासकांठा येथे मोठी दुर्घटना
वृत्तसंस्था/ बनासकांठा
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे मंगळवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 17 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफ पथकाने तेथे धाव घेतली. ही दुर्घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कारखान्यात आग लागल्यावर अनेक स्फोट होत त्याचा काही हिस्सा कोसळला आणि यामुळे अनेक कामगार आतमध्ये अडकून पडल्याचे पोलीस अधिकारी विज चौधरी यांनी सांगितले आहे. डीसाच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा विस्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. अनेक जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. विस्फोटाची तीव्रता अधिक असल्याने कारखान्याचा स्लॅब कोसळला अशी माहिती जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी दिली. आग अत्यंत भीषण असल्याने कारखान्याचे अवशेष 200 मीटरपर्यंत दूर फेकले गेले. मृत कामगारांचे अवशेष देखील विखुर गेले. आग नियंत्रणात आल्यावर जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटविण्यात आला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
दुर्घटनेत जीव गमाविणाऱ्या कामगारांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे, दुर्घटनेवेळी 20 हून अधिक लोक कारखान्यात होते. आतापर्यंत 17 जणांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. तर 4 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी केवळ फटाक्यांचा साठा करण्याची अनुमती दिली होती, परंतु तेथे फटाक्यांची निर्मिती केली जात होती असे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर कारखान्याचा मालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.