महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एक्सपायरी डेट...

06:47 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

औषधांच्या दुकानात गेलो की हमखास ऐकायला मिळणारा शब्द. आपण अशी औषधे, अन्नपदार्थ, वस्तू लगेचच बाद ठरवतो. एवढेच काय? आपल्या परिसरात असलेले शंभर वर्षांपूर्वीचे पूल, बांधकामं, जुने वाडे, ह्यालादेखील एक्सपायरी असतेच. आजकाल अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट हा शब्द ऐकला की एक्सपायरी डेटची आठवण होते. खरंतर त्या इमारतीच्या आठवणी, शेजारी पाजारी, घरकाम करणाऱ्या बायका, फिरण्याच्या जागा, भाजी विक्रेते सगळे काही अंगवळणी पडलेले असते. अशावेळी हा बदल नको असतो. त्या सगळ्याला एक प्रकारचा अर्जंट ब्रेक लागल्यासारखा होतो. आपण ठराविक गोष्टींच्याच एक्सपायरीबद्दल बोलत असतो. आपली भावनिक गुंतवणूक, मैत्रीचे स्नेहबंध, नाती, सुटता सुटत नाहीत. कारण या गोष्टी न संपणाऱ्या असतात. काही दिवसांपूर्वी श्री. म. माटे यांचा एक लेख वाचनात आला. ‘शिक्षकाने केव्हा मरावे’...1950 च्या आधीचा हा कालखंड आहे. अत्यंत अल्प पगारावर मोठं कुटुंब चालवणारा दयनीय शिक्षक त्यांच्या डोळ्यासमोर होता. पण आता परिस्थिती पूर्ण पालटली आहे. पाच आकडी पगार घेणारा शिक्षक व निवृत्त शिक्षकदेखील आनंदाने जगतोय. सेवाकाळापेक्षा जास्त वर्ष पेंशन घेतोय. अशा नोकरीला एक्सपायरी का असावी?. पण ती ठराविक वयानंतर काळ ठरवतोच. जन्माबरोबरच मृत्युची तारीख ठरलेली असतेच. आपण ती सोयीस्कर विसरलेले असतो इतकंच. तरीही आपल्या पदांना, हुद्यांना, बक्षिसांना एक्सपायरी हवी. आपल्या तोंडावर आपलं अस्तित्व विसरणारी माणसं पाहिली की वाटतं आता लगेच एक्सपायरी आली तरी हरकत नाही. आपली घरातली किंमत आपली एक्सपायरी ठरवत असते. आपल्या हातात काहीच नसतं. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या नात्याने जगत रहावे. देवांनी आपले श्वास किती मोजून पाठवले याची कल्पना नसल्यामुळे असे वाटते खरे. पण आपली पदं, बक्षिसं, मानसन्मान आपल्याला एखाद्या झुलीप्रमाणे बाजूला काढून ठेवता आलं पाहिजे. परंतु इथेच आमचा घोटाळा होतो. आणि माणसं या सगळ्यांसकट वावरताना दिसतात. कुठेही गेलं तरी त्यांना त्याच पदाने बोलावले पाहिजे असा अट्टाहास करतात आणि मग हीच गोष्ट अगदी हास्यास्पद होऊन बसते. निसर्गातल्या गोष्टींना देखील म्हणजे वृक्षाला, प्राण्यांना, पशूंना हा कालखंड ठरलेला असतो. ते कधीही वाढलेल्या वयाची खंत करत नाहीत किंवा एक्सपायरीची वाटही बघत नाहीत.  त्यांच्या मृत्यूची वेळ आली की एका विशिष्ट ठिकाणी एकांतात जाऊन निसर्गक्रमाने येणाऱ्या मृत्यूची वाट बघत बसतात. असं आपल्याला होता आलं पाहिजे. सरकारी बक्षीस म्हणजे गॅलेंटरी अॅवॉर्ड कधीही आपल्याला प्रत्यक्ष दिले जात नाहीत. त्याची फक्त घोषणा केली जाते. ही सर्व बक्षीसं सरकारकडे जमा असतात. आणि म्हणूनच ही माणसं अलिप्तपणे वागू शकतात. त्यांचा मोठेपणाच तेवढा असतो. निसर्गाच्या ऋतुचक्रात अशी एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळते. चैत्र पालवीनंतर अव्याहत सुरू असणारी, अन् येणारी पालवी शिशिरामध्ये निमुटपणे पाय उतार होते. झाडांवर आलेली फुलं एका ठराविक काळानंतर कोमेजतातच. म्हणून एक लक्षात ठेवायचं एक येणार आहे आणि एक जाणार आहे. ‘चेंज इज द ओन्ली परमनंट थिंग इन दीस वर्ल्ड.’

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article