महागडे जाकीट : केजरीवालकडून सफाई
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एक महागडे जाकीट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेकवेळा एका हिरव्या रंगाच्या जाकीटाचा उपयोग केला आहे. या जाकीटाची किंमत 25 हजार रुपये असल्याचे बोलले जात आहे. या महागड्या जाकीटावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे. गुरुवारी केजरीवाल यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या जाकीटासंबंधी स्पष्टीकरण दिले. त्यांना या मुलाखतीत यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार असे जाकीट दिल्लीच्या चांदनी चौक येथील बाजारात अडीच हजार रुपयांना मिळते. भारतीय जनता पक्षाने या जाकीटाची किंमत 25 हजार रुपये अशी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हा निवडणूक मुद्दा नाही
प्रत्येकाने निवडणूक महत्वाच्या आणि जनहिताच्या मुद्द्यांवर लढविली पाहिजे. जाकीट आणि त्याची किंमत हा निवडणूक मुद्दा होऊ शकत नाही. दिल्लीत सध्या बेरोजगारी, महागाई, पायाभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य व्यवस्था असे मुद्दे आहेत. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने या मुद्द्यांवर त्यांची भूमिका काय आहे, तसे स्पष्ट करावे, या मुद्द्यांवर त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये काय केले ते जनतेसमोर मांडावे, असे आवाहनही त्यांनी या राजकीय पक्षांना केले.