इंडोनेशिया ओपनमध्ये सात्विक-चिरागकडून अपेक्षा
इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन आजपासून
वृत्तसंस्था/ जकार्ता
माजी विजेते सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या 1,450,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील.
मागील आठवड्यात सिंगापूर ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तंदुरुस्ती मिळवल्यानंतर पुन्हा एकदा खेळायला आलेली ही माजी जागतिक अग्रमानांकित जोडी या आठवड्यात पुढे जाण्यासाठी आणि 2023 मध्ये जिंकलेली ट्रॉफी पुन्हा मिळवण्यासाठी उत्सुक असेल. सध्या 27 व्या क्रमांकावर असलेले सात्विक-चिराग सिंगापूरमधील कामगिरीनंतर टॉप 20 च्या जवळ येण्याची अपेक्षा आहे. ते इस्तोरा सेनावन एरिनामध्ये लिओ रॉली कार्नांड आणि बागास मौलाना या इंडोनेशियन जोडीविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. इस्तोराची परिस्थिती भारतीयांसाठी अनुकूल आहे आणि पहिला विजय मिळविल्यानंतर मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह दूई यिक यांच्याशी सामना होण्याची शक्यता आहे, ज्यांनी गेल्या आठवड्यात त्यांची घोडदौड रोखली होती. भारतीय जोडीविरुद्ध त्यांचा प्रभावी विक्रम आहे.
सात्विकच्या आरोग्याच्या समस्या आणि चिरागच्या पाठीच्या दुखापतीमुळे काही काळ या दोघांना खेळता आले नव्हते. तथापि, या स्टार जोडीने गेल्या आठवड्यात त्यांची ट्रेडमार्क प्रतिभा दाखवली जेव्हा त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करताना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या मलेशियन जोडी गोह से फेई आणि नूर इज्जुद्दीन यांच्याविरुद्ध रणनीतिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी केली होती.
या वर्षीच्या निराशाजनक कामगिरीनंतर दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू देखील अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल. फेब्रुवारीमध्ये गुवाहाटी येथे सराव करताना या 29 वर्षीय खेळाडूला धोंडशिरेची दुखापत झाली होती, यामुळे ती आशियाई टीम चॅम्पियनशिपमधून बाहेर पडली. परतल्यापासून, तिने थुय लिन्ह गुयेन, पुत्री कुसुमा वर्दानी आणि किम गा यून यासारख्या खेळाडूंविरुद्ध सामने गमवावे लागल्याने स्पर्धांमधून लवकर बाहेर पडावे लागले होते. गेल्या आठवड्यात, तिने आपल्या दर्जाची झलक दाखवली. पण दुसऱ्या फेरीत टोकियो ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या चेन यू फेईकडून थोड्याशाच फरकाने पराभूत झाली. इंडोनेशियन प्रशिक्षक इरवंस्याह अदी प्रतामा यांच्यासोबत, सिंधूला जपानच्या माजी विश्वविजेत्या नोझोमी ओकुहारा या परिचित प्रतिस्पर्ध्याशी सामना करताना तिची लय पुन्हा शोधण्याची आशा असेल.
गेल्या काही वर्षांत या दोघांनी अनेक आव्हानात्मक लढती केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्यात असलेली तीव्र प्रतिस्पर्धा प्रतिबिंबित होते. मंगळवारचा सामना आणखी एक रोमांचक लढत ठरेल कारण दोन्ही खेळाडू जागतिक बॅडमिंटनमध्ये आपला लौकीक पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतील. विजय मिळाल्यास 2019 च्या विश्वविजेत्या सिंधूचा दुसऱ्या फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगशी सामना होऊ शकतो. महिला एकेरीत अनुपमा उपाध्याय कोरियाच्या किम गा यूनशी, रक्षिता श्री रामराज थायलंडच्या डावखुऱ्या सुपानिदा काटेथोंगशी सामना करेल, तर मालविका बनसोडचा सामना इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीशी होईल.
पुरुष एकेरीत, 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेता एचएस प्रणॉय इंडोनेशियाच्या अल्वी फरहानशी सामना करताना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन पाठीच्या दुखापतीतून बाहेर पडत आहे, ज्यामुळे त्याला गेल्या आठवड्यात मलेशिया स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. पॅरिस ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरीत पोहोचल्यापासून अल्मोडाचा हा शटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या शी यू क्यू विरुद्ध सलामीलाच सामना करावा लागेल. त्याचा पीपीबीए अकादमीचा सहकारी किरण जॉर्ज माजी विश्वविजेत्या लोह कीन यू विरुद्ध मोहीम सुरू करताना एलिट खेळाडूंविरुद्ध स्वताला आजमावून पाहिल.
महिला दुहेरीत, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत. जपानच्या युकी फुकुशिमा आणि मयू मात्सुमोटोशी त्यांची लढत होईल.. मिश्र दुहेरीतही ध्रुव कपिला/तनिषा क्रॅस्टो, रोहन कपूर/रुत्विका ग•s शिवानी, सतीश करुणाकरन/आद्या वरियथ आणि अशिथ सूर्या/अमृता प्रमुथेश या चार जोड्या भारताचे प्रतिनिधित्व करतील.